टी 20 वर्ल्डकप तिकीट विक्री सुरू

हिंदुस्थान-पाकिस्तान लढतीला क्रिकेटप्रेमींचा तुफान प्रतिसाद
। दुबई । वृत्तसंस्था ।
ओमान व यूएई येथे 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात येणार्‍या टी-20 वर्ल्ड कपमधील लढतींच्या तिकीट विक्रीला सुरुवात झाली असून 24 ऑक्टोबरला दुबई येथे खेळवण्यात येणार्‍या हिंदुस्थान-पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधील लढतीला क्रिकेटप्रेमींचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. यूएई व ओमान सरकारकडून स्टेडियममध्ये 70 टक्के क्रिकेटप्रेमींना परवानगी देण्यात आल्यामुळे आता हिंदुस्थानच्या सर्व लढतींसाठी तिकीट खिडकीवर तसेच ऑनलाइन झुंबड उडाली आहे.
टी-20 वर्ल्ड कप यूएई व ओमान येथे आयोजित करण्यात आला असला तरी या स्पर्धेचे आयोजक बीसीसीआय आहे. बीसीसीआय व आयसीसी यांनी मिळून यूएई सरकारकडे स्टेडियममध्ये प्रेक्षकांना परवानगी देण्यात यावी अशी मागणी केली होती. आता ही मागणी मान्य झाल्यामुळे टी-20 वर्ल्ड कपच्या बहुतांशी लढती हाऊसफुल्ल होतील यात शंका नाही.
हिंदुस्थान-पाकिस्तान या हायव्होल्टेज लढतीसाठी क्रिकेटप्रेमींची झुंबड उडाली आहे. या स्पर्धेतील लढतींसाठी कमीतकमी तिकिटाचे दर सहाशे रुपये ठेवण्यात आले आहेत. पण हिंदुस्थान-पाकिस्तान यांच्यामधील लढतीसाठी क्रिकेट फॅन्स एका तिकिटासाठी लाखो रुपये मोजताना दिसत आहेत. एक तिकीट 333 अधिक टक्क्यांनी विकले जात आहे. या लढतीसाठी महाग तिकीट दोन लाख रूपयांपर्यंतचे आहे.

Exit mobile version