टी-20 विश्वचषक स्पर्धेची ठिकाणं जाहीर

10 मैदानांवर खेळवले जाणार 55 सामने

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) शुक्रवारी (दि.22) 2024 च्या टी-20 विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर केले. तारखा जाहीर करण्याबरोबरच, आयसीसीने स्पर्धेचे सामने कुठे खेळले जातील याची ठिकाणेही जाहीर केली आहेत. कॅरिबियन आणि अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने 2024 टी-20 विश्वचषक स्पर्धा 4 जूनपासून सुरू होणार आहे. विश्वचषकाचा अंतिम सामना 20 जून रोजी होणार आहे.

या 10 ठिकाणी खेळणार 20 संघ
आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 स्पर्धेचे सामने एकूण 10 ठिकाणी खेळवले जातील. यापैकी 7 स्थळे कॅरेबियन देशांना तर 3 ठिकाणे अमेरिकेला देण्यात आली आहेत. विश्वचषकाचे सामने अँटिग्वा आणि बार्बुडा, बार्बाडोस, डॉमिनिका, गयाना, सेंट लुसिया, सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्स, त्रिनिदाद आणि टोबॅगो येथे होणार आहेत. त्याचबरोबर अमेरिकेतील फ्लोरिडा, डॅलस आणि न्यूयॉर्कलाही यजमानपद मिळाले आहे. यावेळी 20 संघ टी-20 विश्वचषकात खेळताना दिसणार आहेत.या स्पर्धेत एकूण 55 सामने खेळवले जाणार आहेत. मात्र, स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. 
हे संघ टी-20 विश्वचषकात दिसणार
वेस्ट इंडिज आणि युनायटेड स्टेट्स याआधीच यजमान म्हणून 2024 च्या टी-20 विश्वचषकासाठी पात्र ठरले आहेत. याशिवाय ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, नेदरलँड, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका हे संघही या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. या व्यतिरिक्त बांगलादेश, अफगाणिस्तान, आयर्लंड, स्कॉटलंड आणि पापुआ न्यू गिनी यांनी पात्रता फेरीद्वारे स्पर्धेत आपले स्थान निश्चित केले आहे.
Exit mobile version