। रेवदंडा । प्रतिनिधी ।
चौलमधील ‘ताडगोळे’ पर्यटकांची खास पंसती असून ऐन उन्हाळयात मोठी मागणी असते. चौल परिसरात ‘ताडगोळ्यांची असंख्य झाडे असून ताडगोळे विक्रीतून स्थानिक मोठे उत्पन्न साधतात.
उन्हाळयाच्या दिवसांत अंगाची लाही लाही होत असताना नैसर्गिक थंडावा देणारे ताडगोळे शरिरातील पाण्याचे प्रमाण टिकवून धरतात. अंगातील उष्णता कमी करणार्या ताडगोळयांचे आयुर्वेदातही अनेक औषधी उपयोग सांगितले आहेत. ताडगोळे हे फळ उन्हाळयात उपलब्ध असणारे फळ आहे. यांची चव काहीशी शाळयांतील मलई सारखी लागत असून चवीला हे फळ फारच मधूर असते. इंग्रजी भाषेत ‘आईस अॅपल’ म्हणून ओळखले जाणारे फळ आरोग्याच्या दृष्टीने अतिशय गुणकारी असल्याचे म्हटले जाते. त्यामुळेच मुंबई, पुणे, ठाणे आदी शहरातून तसेच परिसरातून आलेले पर्यटक, स्थानिकवर्ग ताडगोळे खरेदी करत असल्याचे चित्र रेवदंडा-चौल बाजारपेठेत दिसत आहे. उन्हाळयात येत असलेल्या ताडगोळयांना बाजारात चांगली मागणी असते.
या फळाच्या सेवनाने शरिराला आवश्यक असलेले क्षार व इतर पोषक तत्वे संतुलित मात्रेमध्ये मिळत असतात. या फळामध्ये कर्करोग प्रतिरोधी तत्वे असून विशेषतः महिलांमध्ये आढळणार्या स्तनाचा कर्करोग टाळण्यासाठी या फळाचे सेवन उत्तम मानले जाते. आरोग्यासाठी या फळाचे फायदे मिळविण्यासाठी उन्हाळयाच्या दिवसामध्ये या फळाचे भरपूर सेवन करावे. ज्यांना लिव्हरच्या संबधीत काही विकार असतील त्याचेसाठी ताडगोळयांचे सेवन उपयुक्त आहे. तसेच, या फळाच्या सेवनाने शरिराला श्रम करण्याची आवश्यक ताकद व उर्जा मिळते. या फळाच्या सेवनाने शरिरातील ग्लुकोजची पातळी वाढत असल्याने दिवसभरासाठी लागणारी ताकद या फळाच्या सेवनातून मिळत असते.
अश्या या गुणकारी ताडगेोळे फळांची फार मोठी मागणी उन्हाळयात पर्यटक व स्थानिक वर्ग करत असतो. चौल परिसरात आर्थिक उत्पन्न देणारे ताडवृक्ष असंख्य संख्येने असून या ताडाच्या वृक्षाच्या लागवड करणे दिवसेंदिवस गरजेचे आहे.