माणगावात महिलांचा पाण्यासाठी टाहो!

नगराध्यक्षांनी धरले मुख्याधिकार्‍यांना धारेवर
30 एप्रिलपर्यंत पाईपलाईन टाकण्याचे लेखी आश्‍वासन

| माणगाव | वार्ताहर |

माणगाव नगरपंचायत हद्दीतील वॉर्ड क्र.11 मधील गजानन महाराज मंदिर परिसर व शेजारील गणेश नगरात ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली असून, गजानन महाराज मंदिर परिसरातील महिलांनी मंगळवार, दि.5 एप्रिल रोजी नगरपंचायत कार्यालय याठिकाणी धाव घेऊन आम्हाला नळपाणी पुरवठा गेली दीड वर्षांपासून होत नसल्याचा टाहो नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांच्यासमोर फोडला.

याबाबतीत नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांनी मुख्याधिकारी राहुल इंगळे यांना धारेवर धरीत या ग्रामस्थांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न कधी मार्गी लागणार, असा सवाल उपस्थित केला. त्यानंतर नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, उपनगराध्यक्ष सचिन बोंबले, पाणीपुरवठा सभापती राजेश मेहता, स्वच्छता सभापती अजित तारळेकर, वॉर्डाचे नगरसेवक कपिल गायकवाड, नगरसेवक दिनेश रातवडकर व उपस्थित ग्रामस्थांनी लेखी मागितल्यानंतर मुख्याधिकारी यांनी दि.30 एप्रिलपर्यंत गजानन महाराज मंदिर परिसरात नळपाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी पाइपलाइन टाकून याठिकाणी व गणेश नगरात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाईल, असे लेखी देऊन आश्‍वासित केले आहे. हा प्रश्‍न या वार्डातील तरुण तडफदार नगरसेवक कपिल गायकवाड यांनी उचलून धरला असून हा प्रश्‍न लवकरात लवकर सुटून येथील ग्रामस्थांना मुबलक पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी अन्यथा उग्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी नगरपंचायत प्रशासनाला दिला आहे.

या परिसरातील ग्रामस्थांनी नळ पाणीपुरवठा प्रश्‍नाबाबत दि.9 नोव्हेंबर 2020 रोजी माणगाव नगरपंचायतीकडे लेखी तक्रार अर्ज केला होता. त्यावेळी नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. त्यांनी या परिसराकडे पाणीपुरवठ्याबाबत लक्ष दिले नसल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यानंतर आता नगरपंचायतीवर माणगाव विकास आघाडीची सत्ता दि.19 जानेवारी 2022 रोजी आली असून, त्यांच्या झालेल्या मासिक सभेत या परिसरातील पिण्याच्या पाण्याचा विषय समोर का आणला नाही, असा सवाल नगराध्यक्ष पवार यांनी मुख्याधिकारी यांना केला.

Exit mobile version