| मुरुड | वार्ताहर |
मुरुड तालुक्यातील विविध भागात गुरे चोरून त्याची कत्तल करण्याच्या घटनेत वाढ होत आहे. शेतकर्यांची पाळीव जनावरे चोरून नेऊन कत्तल करण्याच्या घटनेत वाढ होत असल्याने तालुक्यातील शेतकरी व दुग्ध पालन व्यवसाय करणारे घाबरले आहेत.
नांदगाव-पांगले येथे तीन गुरांची कत्तल, मोरे येथे एका बैलाची कत्तल, बारशीव येथे दोन बैल पळवून नेले होते. परंतु सदरचे आरोपी रोहा येथे पकडल्याने त्या शेतकर्यास ते बैल परत मिळाले. आताच घडलेली काशीद पुलाखाली जनावरांची कत्तल तसेच नांदगाव येथील प्रतीक दळवी यांच्या दोन गीर गाई व वासरू गायब झाले आहेत. तालुक्याच्या अन्य भागात सुद्धा अश्या घटना घडत असल्याबद्दल ने पाळीव जनावरांचे संरक्षण कसे करावे हा मोठा प्रश्न मुरुड तालुक्यातील शेतकर्यांना पडला आहे.
गुरे चोरून नेणार्यांचा शोध लावावा व कत्तल होऊ नये यासाठी मुरुड पोलिसांनी सजग राहून यावर प्रतिबंध आणावे यासाठी नांदगाव ग्रामपंचायत हद्दीमधील लोकांनी मुरुड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल अतिग्रे याना रीतसर निवेदन देण्यात आले आहे. सदरचे निवेदन देते वेळी भारतीय जनता पार्टीचे मुरुड तालुका अध्यक्ष महेंद्र चौलकर, नांदगाव ग्रामपंचायत चे माजी सरपंच विद्याधर चोरघे, महेश मापगांवकर, माजी उपसरपंच जितेंद्र दिवेकर, नांदगाव विभाग प्रमुख नरेश कुबल, प्रतीक दळवी, उसरोली ग्रामपंचायत उपसरपंच महेशकुमार पाटील विष्णू नागावकर, जयप्रकाश फणसेकर, आदी सह अनेक नागरिक उपस्थित होते.
यावर पोलीस निरीक्षक राहुल अतिग्रे यांनी सुद्धा पाळीव जनावरे आपल्या गोठयात बांधणे खूप गरजेचे आहे. त्यांना मोकाट सोडू नका लवकरात लवकर आम्ही या घटनांवर नियंत्रण मिळवू असे आश्वासित केले आहे.