एफआरपीप्रमाणे ऊस बिल न देणार्‍या कारखान्यांवर कारवाई करा

साखर आयुक्तांकडे शेकापची मागणी
बीड | प्रतिनिधी |
गळीत हंगाम 2020 – 2021 मध्ये गाळप झालेल्या ऊसाचे बिल 14 दिवसात देणे बंधनकारक असताना 60 ते 70 दिवस उलटून गेले तरी बीडसह मराठवाड्यातील कारखान्यांनी ऊस बील शेतकर्‍यांना दिलेले नाही. पेरणीच्या तोंडावर कोरोना काळात शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे, शेतकर्‍यांचे ऊसाचे बील चौदा दिवसाच्या आत एफआरपी प्रमाणे न देणार्‍या कारखान्यांवर कारवाई करण्याची मागणी शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते मोहन गुंड यांनी साखर आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

बीडसह मराठवाड्यातील कारखान्यांनी पहिला ऊसाचा हप्ता आपल्या सोयीनुसार शेतकर्‍यांना जमेल तसा वाटप केला आहे. बीड जिल्ह्यामध्ये तर कारखानदारांनी तेराशे, अठराशे, दोन हजारांपेक्षा कमी अधिक असा पहिला हप्ता वाटप केला आहे. हिच परिस्थिती मराठवाड्यातील औरंगाबाद, उस्मानाबाद, लातूर, परभणी,नांदेड, हिंगोली कारखान्यांची आहे बील वाटपात आहे,असे गुंड यांनी साखर आयुक्तांना सादर केलेल्या निवेदनातून नमूद केलेले आहे.

कारखानदार रिकव्हरी कमी दाखवून ऊस बील कमी देत शेतकर्‍यांना लाखो रुपयांना लुबाडात आहेत. एफआरपी पेक्षा कमी भाव देणार्‍या आणि 14 दिवसांच्या आत शेतकर्‍यांना ऊस बिल न वाटप करणार्‍या बीडसह मराठवाड्यातील कारखान्यांची चौकशी करुन दहा दिवसात संबंधित कारखान्यांवर कारवाई करा, अन्यथा आपल्या कार्यालयासमोर शेकापच्यावतीने आंदोलन करण्यात येईल असा इशाराही गुंड यांनी मुख्यमंत्री, सहकारमंत्री, साखर आयुक्त, साखर सहसंचालक औरंगाबाद,नांदेड सोलापूर यांना पाठविलेल्या निवेदनातून दिलेला आहे. या निवेदनावर मोहन गुंड,सागर आल्हाट, शत्रुघ्न तपसे, सिध्दार्थ कार्लेकर यांच्या स्वाक्षरी आहेत.

Exit mobile version