। नागपूर । प्रतिनिधी ।
राज्यातील बोगस पॅथॉलॉजिस्टवर तातडीने कारवाई करण्याची मागणी आ .जयंत पाटील यांनी केली आहे. याबाबत डॉ. रणजित पाटील, सुनिल शिंदे, विलास पोतनीस आदीनी आरोग्य मंत्र्यांकडे खुलासा करण्याची मागणी केली.
राज्यात विशेषत: मुंबई, ठाणे, पुणे, नवी मुंबई येथील पॅथॉलॉजिस्ट लॅब मध्ये स्वतःच्या देखरेखीखाली वैद्यकीय तपासण्या करून वैद्यकीय अहवालावर स्वाक्षरी करण्याचा तसेच मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या एम.सी.आय. नियमांचे पालन न करता प्रत्यक्षात हजर नसताना बेकायदा प्रॅक्टीस करुन एकाच पॅथॉलॉजिस्टच्या नावे डिजिटल स्वाक्षरीचा वापर करून अनेक लॅब मध्ये तपासण्यांचे रिपोर्ट देण्यात येत आहेत, सर्वोच्च न्यायालयाने दिलेला असतानाही राज्यात अनेक ठिकाणी पॅथॉलॉजिस्टच्या अनुपस्थितीत तंत्रज्ञ स्वतःच्या सहीने रुग्णांना अहवाल देतात. सदरहू कायदा आणण्यासाठी 18 सदस्यीय तज्ज्ञ समिती नेमण्यात येणार आहे काय, अशी विचारणाही करण्यात आली आहे.
यावर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी राज्यात बोगस पॅथॉलॉजिस्ट असल्याचे मान्य केले आहे. याबाबतच्या तक्रारी आयुक्त, आरोग्य सेवा व अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान या कार्यालसास प्राप्त झाल्या आहेत. वैद्यकीय प्रयोगशाळेचे (मेडिकल लॅबोरेटरी) नियंत्रण व नियमन करण्यासंदर्भात मार्गदर्शक तत्वे तयार करण्यासाठ शासन निर्णयाद्वारे आयुक्त, आरोग्य सेवा व संबंधित क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींची समिती गठित करण्यात आलेली होती. तथापि, सदरच्या अहवालाच्या अनुषंगाने अधिकची माहिती आरोग्य सेवा आयुक्तालयाकडून मागविण्यात आलेली आहे. सद्य:स्थितीत राज्यातील वैद्यकीय प्रयोगशाळा नोंदणीबाबत कोणताही कायदा अस्तित्वात नाही. त्यामुळे या प्रयोगशाळांची नोंदणी राज्यातील कोणत्याही आस्थापनेत होत नाही. आयुक्त, आरोग्य सेवा व अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान यांचेकडून वैद्यकीय प्रयोगशाळेने (मेडिकल लॅबोरेटरी) नियंत्रण व नियमन करण्यासंदर्भात प्राप्त अहवालाच्या अनुषंगाने शासनाने विचारणा केलेली अधिकची माहिती प्राप्त करून घेण्याची कार्यवाही सुरु आहे, असे म्हटले आहे.