भ्रष्ट अधिकार्‍यांवर कारवाई करा

पाटील यांचे जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदन

। अलिबाग । प्रतिनिधी ।

आपल्या पदाचा गैरवापर करीत महसूल दप्तरी बदल करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विजय पाटील यांनी केली आहे. याबाबत त्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली असून जिल्हाधिकारी यांच्यावतीने तहसीलदार चंद्रसेन पवार यांनी हे निवेदन स्विकारले आहे. येत्या सात दिवसांत तक्रार अर्जाची दखल घेण्यात यावी अन्यथा उपोषण करण्यात येईल, अशा इशारा विजय पाटील यांच्याकडून देण्यात आला आहे.

दादर येथील सर्व्हे नंबर 462 सरकारी आकार पड जमीनीमधील खोटे दस्तऐवज सादर करून तलाठी दप्तरी खोटे सातबारा बनविले होते. याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी याबाबत लेखी तक्रार केली होती. त्यानंतर उपविभागीय अधिकारी यांच्या न्यायालयात याबाबत सुनावणी झाली. सुनावणीतून पेणमधील उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशानुसार खोटे बनविलेला सातबारा रद्द करण्याची कार्यवाही करण्यात आली. परंतु, केवळ शासकिय अधिकार्‍यांनी अर्थपूर्ण संबंधातून चुकीची माहिती देऊन महसूल दप्तरी बदल करणे चुकीचे आहे. त्यामुळे दप्तरात केलेले खोटे बदल करणारा कर्मचारी त्याला जबाबदार असल्याचा आरोप विजय पाटील यांनी केला आहे. सातबारा उतार्‍यावर केलेली खाडाखोड, फेरफारमध्ये केलेले बदल तसेच जाणून बुजून खरा अहवाल लपविण्याचा प्रयत्न संबंधित अधिकार्‍यांनी केला आहे. भ्रष्ट अधिकार्‍यांमुळे महसूल विभागाला ठपका लागत आहे. त्यामुळे खोटे कागदपत्रे, खाडाखोड करणार्‍या या अधिकार्‍यांवर कारवाई होणे गरजेचे आहे. येत्या सात दिवसांत अर्जाची दखल घेण्यात यावी अन्यथा उपोषण करण्यात येईल, असा इशारा विजय पाटील यांच्याकडून निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

Exit mobile version