टोईंग व्हॅन कर्मचार्‍यांवर कारवाई करा

वंचित बहुजन आघाडीचे पोलिसांना निवेदन

| वावोशी | वार्ताहर |
खोपोली शहरात पार्किंगचा प्रश्‍न तीव्र बनला असून, बेशिस्तांवर कारवाईसाठी टोइंग व्हॅनचा वापर होत आहे. मात्र, हा उपायच वाहनधारकांच्या डोकेदुखीचे कारण ठरू लागला आहे. नियमबाह्य कारवाईकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असून, केवळ नो पार्किंगमधील वाहने उचलण्यात पोलिस आणि टोइंग व्हॅनचे कर्मचारी धन्यता मानत आहेत, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे रायगड जिल्हा युवक अध्यक्ष अमित गायकवाड यांनी केला आहे. या मुजोर टोइंग व्हॅनच्या कर्मचार्‍यांवर थेट कारवाई करावी याकरिता खोपोलीचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांना गायकवाड यांनी निवेदन दिले आहे.

खोपोली रेल्वे स्थानकाशेजारी आपली दुचाकी लावली असता त्यांना या मुजोर टोइंग व्हॅनच्या कर्मचार्‍यांचा कटू अनुभव आला. खोपोली तसेच आसपासच्या विभागामधील वाहनधारकदेखील या कारवाईमुळे कमालीचे त्रस्त झाले आहेत. या कारवाईमुळे वाहनधारकांना मनस्ताप, तर पोलीस व टोइंग व्हॅनधारकांचे शिस्तीच्या नावाखाली चांगभलं होत आहे, असा आरोप गायकवाड यांनी केला आहे. खोपोली शहरातील नो पार्किंगमधील गाड्या उचलणारे कंत्राटी कर्मचारी असभ्य वर्तन करत असल्याच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून, या कर्मचार्‍यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन खोपोलीचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांना देण्यात आले आहे.यावेळी अमित गायकवाड यांच्यासह जिल्हा महासचिव वैभव केदारी, जिल्हा सचिव ऋतिक गायकवाड, खालापूर तालुका युवक अध्यक्ष योगेश गायकवाड व कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version