सरकारी जमिनी घशात घालणार्या धनदांडग्यांना विरोध करणार्या महिला आणि ग्रामस्थांना अमानुषपणे मारहाण करण्याची घटना आज विहूर गावात घडल्याने सर्व स्तरातून याचा निषेध करण्यात येत आहे. या प्रकरणात भूमाफिया म्हणून कुप्रसिद्ध असणार्या अलिबाग मुरुडमधील मोठ्या राजकीय नेत्याचा समावेश असल्याचे बोलले जाते. तसेच मुरुडच्या नवाबाचा ही समावेश असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले आहे. मात्र राजकिय दबाव, धनदांडग्यांची हुकूमशाही न जुमानता लढा उभारणारे विहूरचे शेकापचे माजी सरपंच रमेश दिवेकर, विद्यमान सरपंच नीलिशा नरेश दिवेकर यांच्यासह अनेकांना पोलिसांनी अटक केली आहे. महिलांवर हात उगारणार्या त्या पोलिसांवर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.