| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील ऐतिहासिक आणि पुरातन असलेल्या कोंढाणे लेणी येथे वर्षासहलीसाठी येणारे हौशी पर्यटक यांच्याकडून मद्यपान तसेच तेथील वास्तूत अस्वच्छता केली जात आहे. या सर्व प्रकारांवर आळा घालावा अशी मागणी कर्जत श्री शिव प्रतिष्ठान, सह्याद्री प्रतिष्ठान आणि रायगडवासी प्रतिष्ठान यांच्याकडून करण्यात आली आहे. अशा मागणीचे निवेदन श्री शिव प्रतिष्ठानकडून करण्यात आली असून, त्या मागणीचे निवेदन कर्जत पोलिसांना देण्यात आले आहे.
कोंढाणे येथे प्राचीन आणि इतिहास सांगणारी लेणी असून, त्या बुद्धकालीन लेणीची पाहणी करण्यासाठी अभ्यासक येत असतात. पावसाळयात त्या ठिकाणी सुंदर धबधबा निर्माण होतो आणि त्या धबधब्यावर मौजमजा करण्यासाठी पर्यटक येत असतात. पर्यटकांकडून या धार्मिक स्थळाचे पावित्र्य नष्ट करत आहेत. वर्षासहलाच्या नावाखाली तेथे येणारे पर्यटक हे मद्यपान करतात. त्याचवेळी सोबत आणलेले खाऊचा कचरा तेथे टाकून परिसर अस्वच्छ करतात. तसेच वेडेवाकडे चाळे या ठिकाणी पर्यटकांकडून केले जात असल्याने या स्थळाचे महत्व आणि पवित्र नष्ट होत असल्याची भावना श्री शिव प्रतिष्ठान, सह्याद्री प्रतिष्ठान आणि रायगडावांसी प्रतिष्ठान यांना वाटत आहे. पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत असलेल्या या कोंढाणे लेणीचे संरक्षण आणि संवर्धन व्हावे अशी मागणी विविध संस्थांकडून करण्यात येत आहे.
त्यामुळे सध्या कोंढाणे लेणी सध्या पर्यटकांच्या गर्दीने गजबजलेली असून काही पर्यटक त्या ठिकाणी मद्यधुंद अवस्थेत सदर लेणीमध्ये धुमाकूळ घालत तिथे असलेल्या प्राचीन शिल्पावर काचेच्या बाटल्या फोडत आहेत तरी हा प्राचीन वारसा जपला गेला पाहिजे यासाठी कोंढाणा लेणी येथे शनिवार, रविवार पोलीस कर्मचारी नेमण्यात यावे अशी मागणी करणारे निवेदन कर्जत पोलीस ठाण्यात देण्यात आले. पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांना निवेदन देण्यासाठी श्री शिव प्रतिष्ठान आणि सह्याद्री प्रतिष्ठानचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.