। पाली । वार्ताहर ।
सुधागड तालुक्यात स्वस्त धान्य दुकानांमधून नागरिकांना निकृष्ट दर्जाच्या धान्याचा पुरवठा केला जात आहे. किडलेला, सडलेला, कुजलेल्या तांदळामध्ये अळ्या व पाखरे असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. सप्टेंबर महिन्यातील धान्य सरकारकडून स्वस्त धान्य दुकानदारांना वितरित करण्यात आले. मात्र, तालुक्यात निकृष्ट दर्जाच्या धान्याचे वितरण केले जात असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. गरीब कुटुंबीयांना स्वस्त धान्य दुकानामधून दोन रुपये दराने गहू तर तीन रुपये दराने तांदूळ प्रति किलो देण्यात येते. सार्वजनिक वितरण व्यवस्थेकडून वितरित होणारा मिलिंगचा तांदूळ हा जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून प्रमाणित केला जातो व नंतर वेगवेगळ्या तालुक्यात रेशनिंग वितरणासाठी पाठविला जातो. परंतु, सुधागड तालुक्यात सप्टेंबर महिन्याकरिता आलेला मिलिंगचा तांदूळ हा अळ्या, पाखरेमिश्रित अत्यंत निकृष्ट दर्जाचा खाण्यास अयोग्य असा शासकीय गोदामातून सुधागडातील रास्त भाव दुकानदार यांना वितरण करण्यात आला आहे. त्यामुळे हे रेशनिंग धान्य घेताना दुकानदारच निकृष्ट दर्जाचे धान्य देत असल्याचा गैरसमज ग्राहकांमध्ये निर्माण झाला आहे. मात्र, हे निकृष्ट दर्जाचे धान्य रोहा येथील भैरवनाथ राईस मिल ठेकेदाराकडून शासकीय गोदामात वितरीत करण्यात आले असून, हा तांदूळ जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाने मंजूर केला कसा? मंजूर केलेला तांदूळ खराब प्रतीचा असेल तर तो पुरविणार्या ठेकेदाराला काळ्या यादीत समाविष्ट करावे, अशी मागणी रास्त भाव धान्य संघटनेचे अध्यक्ष अनुपम कुलकर्णी यांनी तहसीलदारांकड केली आहे
- केलेल्या तक्रारी अर्जानुसार यासंदर्भात शहानिशा करून संबंधित ठेकेदार व गोदामपाल यांच्यावर कारवाई करण्यात येईल. – दिलीप रायन्नावर, तहसीलदार, सुधागड पाली
- शासननाकडून तालुक्यात निकृष्ट दर्जाचा तांदूळ रास्त भाव दुकानदारांना दिला गेला. परंतु, ग्राहकांच्या रोषाला मात्र दुकानदारांना सामोरे जावे लागत आहे. याची तात्काळ दखल घेऊन ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी, अशी संघटनेने मागणी केली आहे. – अनुपम कुलकर्णी, अध्यक्ष, रास्त भाव धान्य संघटना, सुधागड