शेतकरी अपघात योजनेचा लाभ घ्यावा- कृषि अधिकारी

| रसायनी | वार्ताहर |

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राबविण्यास मान्यता मिळाली असून, लाभार्थी यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन खालापूर तालुका कृषी अधिकारी अर्चना नारनवर-सुळ यांनी केले आहे.

राज्यातील शेतकर्‍यांचा शेती व्यवसाय करताना होणारे अपघात, विशेषत: पाण्यात बुडून मृत्यू होणे, कीटकनाशके हाताळताना अथवा अन्य कारणांमुळे होणारी विषबाधा, विजेचा धक्का बसणे, वीज पडणे, उंचावरुन पडून झालेला अपघात, सर्पदंश व विंचूदंश, नक्षलवाद्यांकडून होणारी हत्या, जनावरांच्या हल्ल्यामुळे अथवा चाव्यामुळे जखमी होऊन होणारे मृत्यू, दंगल अन्य कोणतेही अपघात यामुळे मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास कुटुंबाच्या उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते. अशा अपघातग्रस्त शेतकर्‍यांस त्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरिता शासनाकडून दोन लाख रुपयांपर्यंत लाभ देण्यात येतो. योजनेसंदर्भातील नवीन शासन निर्णय दि. 19 एप्रिल रोजी निर्गमित झाला आहे. या शासननिर्णयापूर्वी कार्यान्वीन असलेल्या गोपिनाथ मुंढे शेतकरी अपघात विमा योजनामधून शेतकर्‍यांना विमा कंपनी तसेच विमा सल्लागार कंपनी यांच्याद्वारे योजनेची अंमलबजावणी करण्यात येत होती. परंतु, सदर विमा कंपनी व विमा सल्लागार कंपनीमार्फत अनावश्यक त्रुटी काढून प्रकरणे नाकारणे इ. बाबी निदर्शनास आल्याने सदर अंमलबजावणीत बदल करण्यात आलेला आहे. त्यानुसार प्रचलित गोपिनाथ मुंढे शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये सुधारणा करुन गोपिनाथ मुंढे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राबविण्याबाबत दि. 17 मार्च 2023 रोजी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता दिली आहे.

या योजनेंतर्गत 10 ते 75 वयोगटातील अपघातग्रस्त शेतकरी व कुटुंबातील वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले सदस्य (आई-वडील, शेतकर्‍याची पत्नी/पती, मुलगा व अविवाहित मुलगी यांचा समावेश ग्राह्य धरण्यात येईल) अशा एकूण दोन जणांकरिता सदरच्या योजनेतून लाभ मिळणार आहे. अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय निकामी होणे – रु.दोन लाख, अपघातामुळे एक डोळा व एक हात किंवा एक पाय निकामी होणे दोन लाख, अपघामुळे एक डोळा अथवा एक हात किंवा एक पाय निकामी होणे – एक लाख रक्कम मिळणार आहे.
या प्रकारे गोपिनाथ मुंढे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेचा लाभ अनुज्ञेय असतील. सदर योजनेअंतर्गत लाभास पात्र असणार्‍या शेतक-याने, शेतकर्‍याच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने अथवा वारसाने शासनाच्या अन्य विभागाकडुन अपघातग्रस्तांसाठी कार्यान्वित असलेल्या योजनेचा लाभ घेतला असल्यास सदर लाभार्थी गोपिनाथ मुंढे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत लाभास पात्र ठरणार नाहीत.

या योजनेच्या लाभासाठी आवश्यक कागदपत्रे 7/12 उतारा, मृत्यू दाखला,शेतक-यांचे वारस म्हणून गाव कामगार तलाठयाकडील गाव नमुना नं 6-क नुसार मंजुर झालेली वारसाची नोंद, शेतकर्‍याच्या वयाच्या पडताळणीकरीता शाळा सोडल्याचा दाखला/आधार कार्ड / निवडणुक ओळखपत्र. ज्या कागदपत्रांच्या आधारे वयाची खात्री होईल असे कोणतेही कागद पत्रे, माहिती अहवाल/स्थळ पंचनामा/पोलीस पाटील माहिती अहवाल, पोस्ट मार्टम अहवाल, इन्क्वेस्ट पंचनामा. वाहन चालविताना अपघात झाल्यास त्याचा मोटार वाहन परवाना, रासायनिक विश्‍लेषण अहवाल (व्हिसेरा) पोलिस अंतिम अहवाल, बाळंतपणात मृत्यु झाला असल्याबाबत वैद्यकिय अधिकार्‍याचे प्रमाणपत्र,अंपगत्त्व अथवा अवयव निकामी होण्याचे कारणाबाबतचे डॉ. चे अंतिम प्रमाणपत्र, प्राथमिक आरोग्य केंद्र/उपकेंद्र/जिल्हा शल्यचिकिस्तक यांचे प्रति स्वाक्षरीसह कायम अपंगत्वाचे प्रमाणपत्र, जनावरांच्या हल्ल्यात मृत्यु होऊन शव न मिळाल्यास क्षतीपूर्ती बंधपत्र आवश्यक. सदर योजनेच्या लाभासाठी घटना घडल्यापासून 30 दिवसांच्या आत परपूर्ण प्रस्ताव तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे सादर करावा.

सदरची योजना ही आवश्यकतेनुसार प्रथम तीन वर्षे राबविण्यात येणार असून, तद्नंतर योजनेचे मूल्यमापन करण्यात योणार आहे. योजना पुढे सुरु ठेवायची की विमा योजना राबवायची याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

अर्चना नारनवर, तालुका कृषी अधिकारी, खालापूर
Exit mobile version