। माणगाव । प्रतिनिधी ।
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक माणगाव तालुक्यातील गोरेगाव येथे उभारण्याबाबत सुधारीत आराखडा समाज कल्याण आयुक्तालयाच्या मान्यतेसाठी सादर करावा व स्मारक उभारण्याबाबत त्वरित कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.
रायगड जिल्ह्यातील गोरेगाव, ता. माणगाव येथील पंचशील बौध्दजन सेवा संघ, या स्वयंसेवी संस्थेमार्फत स्मारक उभारणे व विविध लोकोपयोगी उपक्रमाबाबत मंत्रालयात मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यांत आलेल्या आढावा बैठकी दरम्यान मुंडे बोलत होते. यावेळी पालकमंत्री रायगड जिल्हा आदिती तटकरे, खासदार सुनिल तटकरे उपस्थित होते.
श्रीवर्धन राज्य मार्गाला लागून असलेल्या मौजे गोरेगाव येथे पंचशील बौद्धजन सेवा संपाच्या जागेवर 1985 मध्ये संस्थेची इमारत बांधण्यात आली. या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सभा घेतली होती. अशा या ऐतिहासिक ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारुन बहुउद्देशीय इमारत बांधण्याचा संस्थेचा संकल्प आहे. या बहुउददेशीय स्मारक व इमारतीसाठी नव्या आराखड्यानुसार निधी देण्यात येणार आहे. या बहुउददेशीय प्रकल्पातून सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक प्रबोधनाचे कार्य घडेल, असा विश्वास ही पालकमंत्री तटकरे यांनी व्यक्त केला. या बैठकीस सामाजिक न्याय विभागाचे दि. रा. डिगळे, अतिरे, प्रादेशिक उपायुक्त मुंबई विभाग वंदना कोचुरे, सुनिल जाधव, विकास गायकवाड, संदिप साळवी इ. मान्यवर उपस्थित होते.