आंबा पिकाची काळजी घ्या

तालुका कृषी अधिकारी आनंद कांबळे यांचे आवाहन

| तळे | प्रतिनिधी |

तळा तालुक्यामध्ये आंबा पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली आहे. सर्वसाधारणपणे आंबा पिकाला नोव्हेंबर महिन्यात पालवी येऊन डिसेंबर-जानेवारी महिन्यात मोहोर येण्यास सुरवात होते. मात्र चालू वर्षी पावसाचा हंगाम लांबल्यामुळे पालवी व पर्यायाने मोहोर येण्याच्या प्रक्रियेस विलंब झाला. त्यातच मोहोर फुटण्यास सुरवात झाल्यानंतर गेल्या एक दोन दिवस काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस पडला. त्यामुळे नवीन येत असलेल्या मोहोरावर ढगाळ वातावरणामुळे तुडतुडे, फुलकिडी यांसारख्या किडी व करपा, भुरी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच उपाययोजना करावी असे आवाहन तालुका कृषी अधिकारी आनंद कांबळे यांनी केले आहे.

यासाठी तुडतुड्यांनी आर्थिक नुकसानीची पातळी (10 तुडतुडे प्रति पालवी/मोहोर) ओलांडली असल्यास व ज्याठीकाणी पिक पालवी अवस्थेत असेल अशा ठीकाणी डेल्टामेथ्रीन 2.8 टक्के प्रवाही 09 मि.ली. प्रती 10 लिटर पाणी, पिक बोंगे फुटण्याच्या अवस्थेत असल्यास लॅम्बडा सायहॅलोथ्रीन 5 टक्के प्रवाही 6 मि.ली. प्रती 10 लिटर पाणी व पिक मोहोर अवस्थेत असल्यास इमिडाक्लोप्रिड 17.8 टक्के प्रवाही 3 मि.ली. किंवा ब्युप्रोफेझिन 25 टक्के प्रवाही 20 मिली प्रती 10 लिटर पाणी तसेच जर फळे वाटाण्याच्या आकाराची अथवा त्याहून मोठी असल्यास थायोमेथॉक्झाम 25 टक्के 1 ग्रॅम प्रति 10 लीटर पाणी याप्रमाणात वापरावे. फुलकिडीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास सदर कीडींच्या व्यवस्थापनाकरीता स्पिनोसॅड 45 टक्के प्रवाही 2.5 मिली किंवा थायोमेथॉक्झाम 25 टक्के 2 ग्रॅम प्रति 10 लीटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. (सदर कीटकनाशके लेबल क्लेम नाहीत). करपा व भुरी रोगांच्या नियंत्रणासाठी बागेत स्वच्छता राखावी रोगट फांद्या कापून काढाव्यात आणि गळून पडलेल्या रोगट पानांचा नाश करावा. तसेच झाडावर कॉपर ऑक्सिक्लोराईड 25 ग्रॅम 10 लिटर किंवा 1 टक्का बोर्डोमिश्रण (1-1-100) किंवा कार्बेन्डॅझिम 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात फवारावे. अधिक माहितीसाठी संबंधित कृषी सहाय्यक किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे संपर्क साधून अधिक माहिती मिळवू शकता, असे आनंद कांबळे यांनी सांगितले.

Exit mobile version