| रायगड | प्रतिनिधी |
जिल्ह्यात निश्चित करण्यात आलेल्या ‘ब्लॅकस्पॉट’ची संबंधित विभागांनी तातडीने पाहणी करून अपघात कमी करण्याकरिता तातडीने दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी अधिकाऱ्यांना दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात रस्ता सुरक्षा समिती आढावा बैठक जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, राज्य महामार्ग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या अख्यत्यारित असलेल्या ब्लॅक स्पॉटस्ची परिवहन विभाग, पोलिस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत तातडीने संयुक्त पाहणी करण्यात यावी तसेच अपघात कमी करण्याकरिता तातडीने दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात. मुंबई-गोवा महामार्गावर आवश्यक त्या ठिकाणी दिशादर्शक चिन्हांचे फलक, मार्गदर्शक चिन्हांचे फलक, वेगमर्यादेचे फलक, रम्लींग स्ट्रिप्स, कॅट आईस व ब्लिंकर्स बसविण्यात यावेत. कशेडी घाटामध्ये देखील अशाच उपाय योजना कराव्यात. महामार्गावरील पेट्रोल पंप, हॉटेल्स यांनी रस्त्यावर अवैधरित्या रस्ता दुभाजक बनविलेले असून त्यामुळेही अपघात होण्याची शक्यता असते. यासाठी महामार्गावरील रस्ता दुभाजक बंद करण्याची आवश्यक कार्यवाही संबंधित विभागाने करावी, असेही निर्देश म्हसे यांनी दिले.
अपघातातील मृत्यूचे प्रमाण हे शून्यावर आणायचे आहे. अपघात कमी करण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून वेगवेगळ्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत. मात्र, वाहनचालकांनीही कर्तव्यभावनेने याकडे पाहावे, असे आवाहन त्यांनी केले. वाहतूकीचे नियम नियम पाळणे हे संस्कृत समाजाचे लक्षण आहे. त्याचे पालन केले, तरच अपघाताचे प्रमाण कमी होऊ शकते. अपघातात एखादी व्यक्ती दगावते, तेव्हा तिच्या संपूर्ण कुटुंबावर मोठा आघात होतो, याकडेही म्हसे यांनी लक्ष वेधले. नियम धुडकावण्याची वृत्ती, दुसऱ्याच्या मार्गात खोडा घालणे, त्याला मागे टाकून कसे पुढे जाता याईल, याचा विचार करणे, छोट्या गोष्टींमध्ये अहंकार डोकावणे या प्रवृत्तींमुळे रस्त्यावर अपघात होतात. रस्ता सुरक्षा प्रत्येक नागरिकांच्या हातात आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पालकांनी व वाहन मालकांनी आपले वाहन कोणाकडे देत आहोत, याची काळजी घेतली पाहिजे. अपघात टाळण्यासाठी मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक हे नेहमी लक्षात ठेवावे. सध्याच्या रहदारीचा विचार करता वाहनचालकाकडे एकाग्रता, चिकाटी, संयम, असे अनेक गुण अपेक्षित आहेत.
याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, अपर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ कोकण भवन सुषमा गायकवाड, जिल्हा नियेाजन अधिकारी जयसिंग मेहत्रे, कार्यकारी अभियंता जगदीश सुखदेवे, पनवेल उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल पाटील, पेण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते, एमएसआरडीसी मुंबई बांद्रा चेतन वाणी, एमएसआरडीसी पुणे सी.जी.जाधव आदींसह सार्वजनिक बांधकाम विभाग, उपप्रादेशिक परिवहन, राष्ट्रीय महामार्ग यासह अन्य विभागांचे अधिकारी उपस्थित होते.