आयएमए अलिबागची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
I अलिबाग I विशेष प्रतिनिधी I
अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोव्हिड केअर सेंटरमध्ये रुग्णाने डॉक्टरवर हल्ला केल्यानंतर सदर रुग्णावर कडक कारवाई करण्याच्या मागणी साठी आज बुधवारी इंडियन मेडिकल असोसिएशन चे अध्यक्ष डॉ विनायक पाटील यांनी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची भेट घेऊन केली. यावेळी त्यांच्या सोबत माजी अध्यक्ष डॉ. राजेंद्र चांदोरकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने, अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ. अनिल फुटाणे आदी उपस्थित होते.
अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोव्हिड केअर सेंटरमध्ये लोणारे येथील एका रुग्णांवर चार दिवसांपासून उपचार सुरू होते. मध्यरात्री २.३० च्या सुमारास डॉ स्वप्नदीप थळे काम करीत होते. त्यावेळी अचानक या रुग्णाने डॉक्टरच्या मागून येऊन सलाईनचा स्टॅन्ड डोक्यात मारला. या हल्ल्यात डॉ. स्वप्नदीप थळे गंभीर जखमी झाले असून त्यांचा डावा डोळा निकामी झाला आहे. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून डॉक्टरांवरील हल्ल्याची ही तिसरी घटना आहे. त्यामुळे डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात आली नाही तर रुग्णांवर उपचार करणे कठीण होईल असे मत यावेळी डॉ. विनायक पाटील यांनी व्यक्त केले.