। मुंबई । प्रतिनिधी ।
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातील सभेत ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांचा व्हिडीओ दाखवला. बाळासाहेबांवर टीका करणारी बाई तुमच्या पक्षाच्या प्रवक्तेपदी कश्या? असा सवाल राज ठाकरे यांनी केला होता. राज ठाकरे यांच्या या टीकेचा सुषमा अंधारे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. राज ठाकरे वंदनीय बाळासाहेबांना मानतात का? तुमच्या निष्ठा ‘घ्या दोनशे, बोला मनसे’ अशी आहे का? तुम्ही माझा व्हिडीओ दाखवता, तेव्हा मी तर कुठल्या राजकारणात नव्हते. त्यामुळे घ्या दोनशे, बोला मनसे अशा माझ्या भूमिका नव्हत्या, असा जोरदार हल्ला सुषमा अंधारे यांनी चढवला आहे.
तसेच, सध्या उठ दुपारी घे सुपारीचं राजकारण सुरू आहे. सुपारीबाज काहीतरी नवे मुद्दे घ्या. 27 वर्षापूर्वीचा एक चंक होता. तो आता दाखवत आहेत. हीच ती माणसं भाऊ मृत्यू शय्यवर असताना नक्कल करायची. अजित पवारांवर काहीही बोलायचे. आता त्यांचे गुणगाण गात आहेत. कोणत्याही मुद्द्यावर ठोस भूमिका घेतल्या नाहीत. राज ठाकरे म्हणजे निगेटिव्ह थॉट प्रोसेस राजा आहे, असा हल्ला त्यांनी चढवला. मी नागवंशी आहे. माझ्या नादाला लागू नका. मला बाई समजून हलक्यात घ्यायची नाही, असा इशाराही सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे यांना दिला.