नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; दोघांना रंगेहाथ पकडले
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
सिडको ट्रान्सफरचे काम करून देण्यासाठी तब्बल दोन लाख रुपयांची लाच स्वीकारणे शासकीय अधिकाऱ्यासह त्याच्या खासगी साथीदाराला चांगलेच महागात पडले आहे. नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी (दि. 28) सापळा रचत लाच घेताना दोघांनाही रंगेहाथ पकडले. या कारवाईत सिडको विभागीय कार्यालयातील प्रभारी सहाय्यक वसाहत अधिकारी यांचा समावेश असून, या घटनेमुळे सिडको कार्यालयातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे व्यवसायाने कॉन्ट्रॅक्टर असून, ते सोसायटी रजिस्ट्रेशन तसेच सिडको ट्रान्सफरची कामे करतात. सानपाडा येथील एका सदनिकेचे सिडको ट्रान्सफर करण्यासाठी तक्रारदाराने 11 जून 2025 रोजी ऑनलाइन पद्धतीने सिडको कार्यालयात अर्ज सादर केला होता. मात्र, हे काम करून देण्यासाठी सिडको विभागीय कार्यालयातील प्रभारी सहाय्यक वसाहत अधिकारी शैलेश आत्माराम घरत यांनी तक्रारदाराकडे चार लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे.
या बेकायदेशीर मागणीला कंटाळून तक्रारदाराने अखेर नवी मुंबई येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे 22 जानेवारी रोजी लेखी तक्रार दाखल केली. तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक धर्मराज सोनके यांनी तात्काळ पडताळणीची प्रक्रिया सुरू केली. पडताळणी दरम्यान लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर विशेष पथकाच्या माध्यमातून सापळा रचण्याचा निर्णय घेण्यात आला. ठरलेल्या योजनेनुसार नेरुळ येथील रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या हॉटेल नवमी येथे दोन लाख रुपयांची लाच स्वीकारण्यात येणार होती. बुधवारी दुपारी सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास तक्रारदाराकडून लाच रक्कम स्वीकारताना प्रभारी सहाय्यक वसाहत अधिकारी शैलेश घरत यांच्या सांगण्यावरून त्यांचा खासगी साथीदार नागेंद्र पांडे लाच घेत असताना नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दोघांनाही रंगेहाथ पकडले. याप्रकरणी प्रभारी सहाय्यक वसाहत अधिकारी शैलेश घरत आणि त्यांचा साथीदार नागेंद्र पांडे यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, शासकीय कामासाठी लाच मागणाऱ्यांना हा मोठा इशारा असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
