| तळा | प्रतिनिधी |
तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे कला-वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे निवासी समाजसेवा शिबीर 15 व 16 नोव्हेंबर रोजी टोकेखार येथे पार पडले. 15 नोव्हेंबर रोजी टोकेखारचे अध्यक्ष जनार्दन माळी व पोलीस पाटील कृष्णा माळी यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी गावातील रस्ते, शाळा, मंदिर, मैदान व परिसराची स्वच्छता केली. सायंकाळी पुन्हा स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. दरम्यान मिठागर शाळेचे मुख्याध्यापक संजय पवार आणि विनोद पवार यांनी शिबिराला भेट देऊन विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
सायंकाळच्या सत्रात मुरूडचे पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी स्पर्धा परीक्षांमधील करिअरच्या संधी या विषयावर मार्गदर्शन केले. रात्री विद्यार्थ्यांच्या कला गुणांना मंच मिळावा यासाठी गीतगायन, नृत्य, भजन, नाटक आदी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तळा ज्युनियर कॉलेज व राजिप शाळा टोकेखारच्या विद्यार्थ्यांनी सर्वांची मने जिंकली. 16 नोव्हेंबर रोजी पुन्हा स्वच्छता उपक्रम राबवण्यात आले. दुपारी समारोप कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी टोकेखारचे अध्यक्ष जनार्दन माळी, पोलीस पाटील कृष्णा माळी, मनोहर माळी, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप ढाकणे, प्रा पाटील एन. सी., शिबीर प्रमुख प्रा जमादार एस.टी. प्रा सर्जे व्ही बी, शिक्षक व गावातील मान्यवर उपस्थित होते.







