तलाठी संघटनेचे जिल्ह्यात धरणे आंदोलन

उद्या करणार कामबंद
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
तलाठयांना शिवीगाळ करणार्‍या अधिकार्‍या विरोधात राज्यभर तलाठी संघटनेने आंदोलनात्मक पवित्रा घेतला असून त्याचे पडसाद रायगड जिल्ह्यात देखील उमटले. जिल्ह्यात ठिकठिकाणी निदर्शने करीत त्यांची त्वरीत बदली करण्याची मागणी केली आहे. अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर रायगड जिल्हा तलाठी संघाचे अध्यक्ष संतोष जांभळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. मागणी मान्य केल्यास मंगळवारपासून कामबंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
राज्य सरकारच्या ई महाभूमी प्रकल्पाचे राज्य समन्वयक यांनी राज्य तलाठी संघाचे राज्य अध्यक्ष तसेच पटवारी महासंघाचे अध्यक्ष यांच्याबाबत सोशल मीडियावर टिपण्णी केली होती. त्याबद्दल महाराष्ट्र राज्य तलाठी महासंघ यांच्यावतीने राज्याच्या इ महाभूमी प्रकल्पाचे राज्य महासमन्वयक रामदास जगताप यांची हकालपट्टी करण्यात यावी या मागणीसाठी राज्यात तलाठी महासंघ विविध प्रकारची आंदोलने करीत आहे. त्यात सात आणि आठ ऑक्टोबर रोजी सर्व तालुकयातील तलाठी संघटनेने काळ्या फिती लावून काम केले. त्यानंतर आज 12 ऑक्टोबर रोजी प्रत्येक तहसील कार्यालयाबाहेर काळ्या फिती लावून धरणे आंदोलन केले. राज्य तलाठी महासंघाची ई महाभूमी प्रकल्प राज्य समन्वयक पदावरून दूर करावे ही प्रमुख मागणी मान्य होत नाही. त्यामुले राज्य तलाठी संघटनेच्या वतीने 13 ऑक्टोबर रोजी तलाठी संघटनेचे सदस्य सर्व प्रकारच्या शासकीय कामावर बहिष्कार टाकतील आणि तरी देखील मागणी मान्य झाली नाही तर हे आंदोलन अधिक आक्रमक रूप धारण करेल असा इशारा शासनाला देण्यात आला आहे. त्यावेळी त्या कालावधीत नैसर्गिक आपत्ती विषयी कामे आणि निवडणूक विषयक कामे आदेशाप्रमाणे करतील. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर हे असेच सुरू राहील, असे कर्जत तलाठी संघाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. या आंदोलनात संतोष जांभळे यांच्यासह जिल्हा सरचिटणीस वल्लभ मसके, सल्लागार ए व्ही गणतांडेल, अमोल घरत, सचिन वाघ, डि आर गुजराथी, पार्वती वाघ, भरत सावंत आदींसह मोठया संख्येने तलाठी तसेच मंडळ अधिकारी सहभागी झाले होते.

Exit mobile version