अफगाणवर तालिबानी राज

काबूल विमानतळावर गोळीबार – पाच ठार
अमेरिकन दूतावासाजवळ स्फोट
काबूल | वृत्तसंस्था |
तालिबानी संघटनेने अफगाणिस्थानावर पूर्ण कब्जा मिळविला असून, तालिबाननं अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये प्रवेश करुन राष्ट्रपती भवन आपल्या ताब्यात घेतलं. यानंतर अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ घनी यांच्यासह अनेक मोठे नेते देश सोडून गेले आहेत.दरम्यान,भीतीपोटी नागरिक आपापल्या देशाकडे मोठ्या प्रमाणात स्थलांतर करु लागले आहेत.त्यामुळे काबूल विमानतळावर एकच गदारोळ निर्माण झाला आहे.
जमावाला पांगविण्यासाठी अमेरिकन लष्कराने गोळीबार केला.त्यात पाचजण ठार झाल्याचे वृत्त आहे.तर चेंगराचेंगरीत शेकडोजण जखमी झालेले आहेत. अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये तालिबान बंडखोरांच्या प्रवेशानंतर हजारो लोकांती गर्दी काबूल विमानतळावर दिसत आहेत. अनेक देशांमधील राजकारणी व्यक्तींना काबूल विमानतळावरून सुरक्षित बाहेर काढण्याचा प्रयत्न होत आहे.
काबूलमधील अमेरिकन दूतावासाजवळ दोन मोठे स्फोट झाल्याचे वृत्त आहे. या स्फोटात कोणी जखमी किंवा ठार झाले की नाही याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. अमेरिकेने आपल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी लपण्यास सांगितले आहे. यासह, काबूल विमानतळावर गोळीबारही झाला आहे, ज्यामुळे काबूल विमानतळावर आग लागली.
व्यावसायिक उड्डाणांवर बंदी
काबूलमधील 11 जिल्ह्यांवर वर्चस्व प्रस्थिपित केल्यानंतर तालिबानने सर्व व्यवसायिक उड्डाणांवर बंदी आणली आहे. त्याचबरोबर विमानतळावर उपस्थित असलेल्या लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी लष्कराची विमाने मदतीसाठी पोहोचले आहेत. अमेरिकेच्या एका लष्करी अधिकार्‍याने ही माहिती दिली आहे.

भारतीयांची सुटका करण्याचेे प्रयत्न
अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षेसाठी दोन विमानं सज्ज ठेवण्याच्या सूचना मोदी सरकारकडून एअर इंडियाला देण्यात आल्या आहेत. काबुलच्या दिशेनं झेपावण्यास सज्ज असलेल्या विमानातील कर्मचार्‍यांची यादी तयार करण्यात आली आहे. अफगाणिस्तानात सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे काबुलमधील हमीद करझाई आंततराष्ट्रीय विमानतळावरून होत असलेली हवाई वाहतूक प्रभावित झाली आहे.

पाक,चीनचे तालिबान्यांना समर्थन
पाकिस्तानच्या पंतप्रधान इम्रानखान यांनी तालिबानी सत्तेचं स्वागत केलं आहे. गुलामगिरीच्या जोखडातून तालिबानची सुटका झाली. जेव्हा आपण दुसर्‍यांची संस्कृती आत्मसात करतो तेव्हा आपण मानसिकरित्या गुलाम होतो. सांस्कृतिक गुलामगिरीतून बाहेर येणं सोपं नसतं. अफगाणिस्तानात आता जे काही होत आहे. ते गुलामगिरीच्या साखळ्या तोडण्यासारखं आहे., असं विधान पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केलं आहे.
तालिबानशी मैत्रीपूर्ण संबंधफ प्रस्थापित करण्यास चीन तयार असल्याचे म्हटले आहे. चीन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी पत्रकारांना सांगितले की, चीन अफगाणिस्तानच्या जनतेच्या अधिकाराचा आदर करतो आणि अफगाणिस्तानशी मैत्रीपूर्ण आणि सहकार्यपूर्ण संबंध विकसित करु इच्छितो.

Exit mobile version