तळीराम पोलिसांच्या ताब्यात

| नवी मुंबई । प्रतिनिधीनी |
थर्टीफर्स्टच्या निमित्ताने राबवलेल्या ड्रंक ण्ड ड्राईव्हच्या मोहिमेत मद्यप्राशन करून वाहन चालवणारे 160 तळीराम पोलिसांच्या हाती लागले आहेत. या सर्वांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई कली असून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍या शेकडो वाहन चालकांवरही कारवाई करण्यात आली आहे.

दोन वर्षे कोरोनाचे सावट असल्यामुळे थर्टीफर्स्ट आणि नववर्षाच्या पार्ट्यांवर शासनाकडून निर्बंध घालण्यात आले होते. त्यामुळे नागरिकांनी मागील दोन वर्षे थर्टीफर्स्ट आणि नववर्ष साधेपणाने साजरे केले होते; मात्र यंदा कोरोनाचे निर्बंध नसल्याने मोठ्या जल्लोषात आणि धूमधडाक्यात नववर्ष साजरे होण्याची शक्यता असल्याने नवी मुंबई पोलिसांनी तीन हजारांपेक्षा अधिक पोलिसांचा बंदोबस्त ठेवला होता. तसेच महामार्गावरील टोलनाके, शहरातील महत्त्वाचे चौक, सिग्नल, जंक्शन अशा विविध ठिकाणी नाकेबंदी लावण्यात आली होती. त्यामुळे शहरात थर्टी फर्स्टच्या मध्यरात्री कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडली नाही.

नवी मुंबई पोलिसांनी थर्टी फर्स्टच्या बंदोबस्तादरम्यान नाकाबंदी करून मद्य पिऊन वाहन चालवणारे वाहनचालक आणि भरधाव वाहने चालवणार्‍या वाहनचालकांवर कारवाई केली. याचबरोबर विनाहेल्मेट फिरणारे, सिट बेल्ट न लावता फिरणारे, तसेच दुचाकीवरून ट्रिपल सीट फिरणार्‍या शेकडो चालकांवर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. – तिरुपती काकडे, पोलिस उपआयुक्त, वाहतूक विभाग

Exit mobile version