| पनवेल | वार्ताहर |
तळोजा औद्योगिक क्षेत्रातून रात्रीच्या वेळी सोडण्यात येणाऱ्या केमिकलच्या उग्र वासामुळे रहिवासी त्रस्त आहेत. याविरोधात विविध पातळ्यांवर लढा दिला जात आहे. प्रत्यक्षात मात्र प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यात अपयश आले आहे. त्यामुळे वाढत्या प्रदूषणाची दखल प्रशासकीय यंत्रणांनी घ्यावी, यासाठी झालेल्या मॅरेथॉनमध्ये तळोजाकरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
कॉलनी फोरम आणि तळोजा हौसिंग फेडरेशनच्यावतीने तळोजा वसाहतीत होत असलेल्या प्रदूषण मुक्तीसाठी एक धाव प्रदूषण मुक्तीफचा नारा देत मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेतला. यावेळी नर्सरीपासून महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला, पुरुष आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यावेळी काही शाळकरी विद्यार्थ्यांनी तळोजाकरांच्या निरोगी आयुष्यासाठी स्वच्छ हवा, पाण्याची मागणी सामाजिक संदेशांमधून दिली. यावेळी सहाय्यक पोलिस आयुक्त प्रदीप तिदार यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर मॅरेथॉनचा प्रारंभ झाला. कॉलनी फोरमच्या अध्यक्षा लीना गरड, तळोजा मॅरेथॉनचे अध्यक्ष मधू पाटील यांच्यासह कमिटीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
परिसरातील समस्यांवर भाष्य तळोजाचा वाढता विस्तार पाहता पाणी पुरवठ्याची समस्या, आग नियंत्रण विभाग कार्यरत होणे आवश्यक आहे. याचबरोबर परिसरातील रस्त्यांचे डांबरीकरण होणे आवश्यक आहे. याशिवाय मुलांना मैदानी खेळ खेळण्यासाठी मैदानाची आवश्यकता आहे. औद्योगिक क्षेत्रातून रात्रीच्यावेळी सोडण्यात येणाऱ्या केमिकलच्या उग्र वासाविरोधात खारघर, रोडपाली, कळंबोली, कामोठे, तळोजा वसाहत, तसेच परिसरातील महिला, पुरुष तसेच शालेय विद्यार्थीं सहभागी झाले होते. वायू प्रदूषणाच्या संपर्कात नियमितपणे येत असल्यास अनेकांची शारीरिक कार्यक्षमता कमी होत असल्याकडे मॅरेथॉनमधून लक्ष वेधण्यात आले.