| चेन्नई | वृत्तसंस्था |
तमिळनाडूचा तमिज अमुधन सध्या जागतिक बुद्धिबळ वर्तुळात चर्चेचे केंद्र बनला आहे. फक्त 9 वर्षांच्या वयात तमिज केवळ अंडर-9 गटात जगातील नंबर-1 खेळाडू बनला नाही, तर तो या वयात 2000 ईलो रेटिंग पार करणारा सर्वात तरुण खेळाडू देखील आहे.
तमिजने अवघ्या चार वर्षांच्या वयात चुलत भावांना पाहून बुद्धिबळ शिकायला सुरुवात केली होती. त्याच्यातील खेळाची नैसर्गिक समज इतकी खोल होती की, एका जिल्हास्तरीय स्पर्धेदरम्यान कल्लाकुरिची येथील बस चालक रविचंद्रन यांची नजर त्याच्यावर पडली. रविचंद्रन अर्धवेळ बुद्धिबळ प्रशिक्षणही देत असत. त्यांनी पाहिले की, कोणत्याही औपचारिक प्रशिक्षणाशिवायही या लहान मुलाने अनुभवी खेळाडूंच्या विरोधात उत्कृष्ट प्रदर्शन केले.
रविचंद्रन यांनी तमिजची प्रतिभा ओळखली आणि त्यांना मोफत प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला. यानंतर तमिजने मागे वळून पाहिले नाही. 6 वर्षांच्या वयात त्याने राज्यस्तरीय अंडर-9 स्पर्धेत 9 पैकी 9 गुण मिळवून सर्वांना आश्चर्यचकित केले. हा त्याच्या कारकिर्दीतील पहिला मोठा ब्रेक होता. तमिजच्या कारकिर्दीतील सर्वात अविस्मरणीय क्षण गेल्या वर्षी आला. एथेंस ऑफ द ईस्ट बुद्धिबळ स्पर्धेत त्याने रौप्यपदक जिंकले. बक्षीस म्हणून या 8 वर्षांच्या मुलाला कार देण्यात आली. कोणत्याही खेळाडूसाठी इतक्या कमी वयात असे बक्षीस जिंकणे हे एक दुर्मिळ यश आहे.
तमिजच्या या यशामागे त्याच्या आई-वडिलांचा असामान्य त्याग आहे. वडील सरकारी नोकरीत आहेत आणि सामान्य शेतकरी कुटुंबातून येतात.तमिजच्या चांगल्या प्रशिक्षणासाठी कुटुंबाने एक कठीण निर्णय घेतला. प्रशिक्षणामध्ये खंड पडू नये म्हणून तमिजची आई त्याच्यासोबत 350 किलोमीटर दूर दुसऱ्या शहरात राहते. तर, वडील घरी 10 वर्षांच्या मुलगी उथिशासोबत राहतात. तमिजचे वडील कबूल करतात की बुद्धिबळ हा एक महागडा खेळ आहे. प्रवास, राहणे, प्रवेश शुल्क आणि प्रशिक्षणाचा खर्च उचलणे त्यांच्यासाठी आव्हानात्मक आहे. तमिजच्या वडिलांचे म्हणणे आहे की, जर त्यांना आधी माहीत असते की या क्षेत्रात इतका खर्च येतो, तर कदाचित त्यांनी हा खेळ निवडला नसता. पण आता तो नंबर-1 खेळाडू असल्याने, आम्ही त्याला अर्ध्यात सोडू शकत नाही. तमिजचा हा प्रवास सुरू ठेवण्यासाठी आता त्यांना एका मोठ्या प्रायोजकाची गरज आहे. आर्थिक अडचणींमुळे ते अनेकदा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकले नव्हते.







