उपोषणकर्त्यांच्या आरोग्य अहवालात छेडछाड

सुधागड प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रताप ; दोषी वैद्यकीय अधिकाऱ्यांवर निलंबनाच्या कारवाईची मागणी

| पाली/बेणसे | प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील वसुधा सामाजिक वनीकरण संस्थेच्या विरोधात विडसई ग्रामस्थांनी दि.(21) गुरुवारपासून आंदोलन छेडलेय. तहसील कार्यालयासमोर विडसई ग्रामस्थ सचिन यशवंत वाघमारे यांनी न्याय्य हक्कांसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. मात्र, पहिल्या दिवसांपासून पाली प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी येऊन उपोषणकर्ते सचिन वाघमारे यांची आरोग्य तपासणी करून अहवाल तयार करीत आहेत. पहिल्या दिवशी डॉ. ममता पांड्ये यांनी उपोषणकर्ते यांचे वजन घेतले असता 65 किलो होते, मात्र मागाहून या अहवालात खाडाखोड करून 60 किलो वजन करण्यात आले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तर त्याहून कहर म्हणजे दि.(23)शनिवारी सायंकाळी डॉक्टर तपासणीसाठी न येता उपोषणकर्ते वाघमारे यांचा आरोग्य तपशील मांडण्यात आलाय. आरोग्य विभागाच्या या गैरकारभाराबाबत उपोषणकर्ते सचिन वाघमारे व विडसई ग्रामस्थांनी संताप व्यक्त करून याप्रकरणी सखोल चौकशी करून दोषी डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांच्या निलंबनाची जोरदार मागणी आंदोलनकर्त्यांनी लाऊन धरली आहे.

उपोषणकर्ते सचिन वाघमारे यांनी व ग्रामस्थ विडसई यांनी केलेल्या मागणीत वसुधा सामाजिक वनीकरण सोसायटीने खुरावले महागाव या मार्गावर उभारलेली कमान तात्काळ हटवावी व येथे सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांची सखोल चौकशी होऊन कारवाई करावी अशी मागणी केलेली आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत जिव गेला तरी माघार घेणार नाही, असा इशारा यावेळी उपोषणकर्ते सचिन वाघमारे व विडसई ग्रामस्थांनी दिला आहे. प्रशासनाकडून धनधांडगे, विकासक यांना अभय देताना गोरगरीब सर्वसामान्य जनतेच्या न्यायहक्कांसाठी उभारलेले सदरचे आंदोलन चिरडण्याचे षडयंत्र सुरू असून यामध्ये आरोग्य विभाग देखील सामील झाला असल्याचा गंभीर आरोप उपोषणकर्ते सचिन वाघमारे व आंदोलक ग्रामस्थांनी केला आहे.

आता या प्रकरणात रायगड जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी लक्ष घालून उचित कारवाई करावी अशी मागणी विडसई ग्रामस्थांनी केली आहे. भविष्यात हे आंदोलन अधिक उग्र होईल आणि पुढील होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार असेल असा इशारा आंदोलनकर्ते सचिन यशवंत वाघमारे व ग्रामस्थांनी दिला आहे. आमरण उपोषणाचा सहावा दिवस असल्याने वसुधा सामाजिक वनीकरण सोसायटी आणि विडसई ग्रामस्थ यांच्यातील संघर्ष पुन्हा पेटणार असल्याचे चिन्ह दिसू लागली आहेत. या आंदोलनाला स्थानिकांचा दमदार पाठिंबा मिळत असल्याने या आंदोलनाची ताकत वाढली आहे. दरम्यान आरोग्य विभागाकडून अहवाल छेडछाड प्रकरणावर मौन बाळगले असून याप्रकरणी वरिष्ठांकडून चौकशी होऊन वस्तुस्थिती पाहून कारवाई होणार असल्याचे समजते.

Exit mobile version