टँकरमुक्त म्हसळा पाणीटंचाईने त्रस्त; खारगावसह अनेक गावे पाण्यासाठी तहानलेली

हंडाभर पाण्यावर भागवावी लागतेय तहान
। म्हसळा । वार्ताहर ।
म्हसळा तालुका 2010 पासून टँकरमुक्त झालेला असताना तालुक्यातील म्हसळा शहरासह खारगाव (बुद्रुक), घोणसे म्हशाची वाडी, तोंडसुरे, आमशेत, संदेरी आणि अन्य काही गावे वाड्यांवर पाणीटंचाईचे संकट भीषण होताना दिसत आहे. यातील काही गावे रात्रभर साठलेले पाणी हंडा, हंडा वाटून घेत आहेत. काही गावांतील मंडळी शेजारील गावाला नळ पाणीपुरवठा करणार्‍या लिकेज लाईन किंवा एअर व्हॉल्व्हमधून पडणारे थेंब थेंब पाणी घेऊन दिवसभराचे भोजनापुरते पाणी मिळवत आहेत. असे तालुक्याचे चित्र आहे.
खारगाव (बुद्रुक) हे गाव सुमारे 1500 ते 1800 लोकसंख्येचे गाव. जंगलातील गवळणीचे पाण्याचे स्रोत (जुनी ग्रॅव्हीटी योजना) हे सर्वच स्त्रोत वाढत्या उन्हाळ्यात आटले असल्याचे सांगण्यात येते. नवीन योजनेत तांत्रिक त्रुटी असल्याने आता नव्याने बांधत असणार्‍या बंधार्‍याचे काम पूर्ण झाल्याशिवाय पाणीपुरवठा नियमित होऊ शकणार नसल्याचे समजते. मागील वर्षी केलेल्या योजनेत त्रुटी असल्याचे जुनी जाणती मंडळी सांगतात. योजना झाल्यावर आता नव्याने स्त्रोताजवळ बंधार्‍याचे काम सुरु आहे. खारगाव बुद्रुक ग्रामपंचायतीसाठी राष्ट्रीय पेयजल योजनेच्या माध्यमातून 37.65 लाख रुपयांची योजना नुकतीच झाली. सरंपच आणि स्थानिक ग्रा.पा.पु. समिती व ग्रामस्थांच्या मागणीनुसार जुन्या ग्रॅव्हिटी स्त्रोतावर नवीन पाइपलाईनने योजना पूर्ण केली. ती योजना जून 20-21 ला ग्रामपंचायतीच्या ताब्यात दिल्याचे ग्रा.पा.पु. विभागाकडून सांगण्यात येते. राष्ट्रीय पेयजल योजनेच्या माध्यमातून फार मोठी रक्कम खर्च करून योजना खार गाव बुद्रुक ग्रामस्थांसाठी त्यांनी बनविलेल्या नियोजनाप्रमाणे केली असल्याचे ग्रा.पा.पु. विभागाकडून सांगण्यात आले. केंद्र आणि राज्य सरकारने ग्रामीण भागामध्ये शुद्ध व पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे म्हणून जलजीवन मिशन हाती घेण्यात आले आहे. टंचाईग्रस्त गावांना सन 2024 पर्यंत योजना राबविण्यात येणार आसल्याबाबत ग्रा.पा.पु. विभागामार्फत सांगण्यात आले.

पाणीपुरवठा योजनांची कामे स्थानिक राजकीय कार्यकर्ते करतात. अनेक वर्षे ती कामे अपूर्ण राहतात. निधी खर्ची पडतो. त्यामुळे ज्या योजना अपूर्ण आहेत, त्यांचा आढावा घेतला जात नाही. तो घेण्याची आवश्यकता आहे. पाणीटंचाई निवारणार्थ ज्या उपाययोजना हाती घेतल्या जातात, त्या काळजीपूर्वक पाहिल्यास विशिष्ट तालुक्यात विशिष्ट गावात त्या वारंवार राबवाव्या लागतात का? असे का होते, याचा शोध घेतला तर बरेच काही कळू शकेल.

एन.वाय. कुळकर्णी, निवृत्त कार्यकारी अभियंता
Exit mobile version