| रसायनी । वार्ताहर ।
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर तळोजा एमआयडीसीमधून पुण्याच्या दिशेने निघालेला टँकर गियर चेंज करताना न्युट्रल झाला आणि ब्रेक कंट्रोल करणे चालकाला जमले नाही, त्यामुळे टँकर रिव्हर्समधे मुंबई लेनवर येऊन रस्त्याच्या कडेला कोसळला. त्या दरम्यान त्यातून नायट्रिक ॲसिड टँकरच्या झाकणातून बाहेर पडू लागले. यावेळी बोरघाटचे वाहतूक पोलीस अधिकारी योगेश भोसले, खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुधाकर लहाने, आयआरबीचे सेफ्टी रिचार्ज शिंदे यांनी तातडीने त्या ठिकाणी धाव घेतली. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी धनंजय गीध, गुरुनाथ साठेलकर, पूजा चांदुरकर, शैलेश मांडवकर, आयआरबी पेट्रोलिंगची टीम, डेल्टा फोर्स आणि खोपोली नगरपालिकेचे अग्निशमन यंत्रणा त्याठिकाणी दाखल झाली होती. शेवटी आयआरबीच्या क्रेनने सदर टँकर व्यवस्थित बाजूला घेण्यात आला. सुदैवाने मोठी हानी टळली.