। ठाणे । प्रतिनिधी ।
ठाण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. उधारीवर सिगारेट दिली नाही, या शुल्लक कारणावरून एका टपरीवाल्याची हत्या करण्यात आली आहे.
ठाण्यातील आझाद नगर परिसरात विष्णू मनोहर कोटीकवार (54) यांची टपरी आहे. सोमवारी सायंकाळच्या सुमारास अनिकेत लक्ष्मण गायकवाड (24) आणि सलमान फुरखान अन्सारी (21) हे दोघे कोटीकवार यांच्या टपरीवर गेले. त्या दोघांनी विष्णू यांच्याकडे उधारीवर सिगारेट मागितली. परंतु, विष्णु यांनी उधारीवर सिगारेट देण्याचे नाकारले. सिगारेट न देण्याच्या रागात अनिकेत आणि सलमानने विष्णु यांना टपरीच्या बाहेर घेऊन जबर मारहाण केली. यात विष्णु यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी अनिकेत लक्ष्मण गायकवाड आणि सलमान फुरखान अन्सारी या दोघांना अटक केली आहे.






