टपरीधारकांना योग्य न्याय द्यावा- पंडित पाटील

| आगरदांडा | प्रतिनिधी |

मुरुड समुद्रकिनार्‍याचे सुशोभिकरण होत आहे. यासाठी राज्य शासनाकडून साडेअकरा कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. सुशोभिकरण करताना स्थानिक टपरीधारकांचे कोणतेही नुकसान होता काम नये. मुरुड समुद्रकिनारी जे टपरीधारक आहेत, ते मध्यमवर्गीय व गरीब आहेत. पर्यटनाच्या माध्यमातून रोजीरोटी चालविणार्‍या टपरीधारकांवर कोणताही अन्याय होता काम नये. त्यांना गाळे उपलब्ध करुन देण्यात यावेत, अशी आग्रही मागणी माजी आ. पंडित पाटील यांनी मुख्याधिकारी पंकज भुसे यांच्याकडे केली आहे.

मुरुड येथे रोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमात आले असताना त्यांनी मुख्याधिकारी पंकज भुसे यांच्या दालनात भेट घेऊन ही मागणी केली आहे. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा सहचिटणीस मनोज भगत, मुरुड तालुका चिटणीस अजित कासार, मनोहर मकु, माजी नगरसेवक आशिष दिवेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पंडित पाटील यांनी काही दिवसांपूर्वी मुरुड समुद्र किनार्‍यावरील टपरीधारकांच्या समस्येबाबत बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्याच अनुषंगाने आज आपण मुख्याधिकारी यांची भेट घेतल्याचे सांगितले. मुरुड समुद्रकिनारी 44 पेक्षा जास्त टपरीधारक असून, पर्यटकांना विविध सेवा देण्याचे काम प्रामाणिकपणे बजावत असतात. समुद्र सुशोभिकरण करताना या टपरीधारकांना हटवण्यात येऊ नये, त्यांना गाळे उपलब्ध करून देण्यात यावेत, अशी मागणी केली. सुशोभिकरण करा, परंतु टपरीधारकांना कोणताही धोका पोहोचता काम नये, असेही पाटील यांनी सांगितले.

यावर मुख्याधिकरी पंकज भुसे यांनी टपरीधारकांना गाळे नव्या स्वरूपात बनवून देणार असल्याचे सांगितले. तसेच त्याबाबतचा प्लॅनसुद्धा कागदावर काढून दाखवला, त्यामुळे सध्या तरी टपरीधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Exit mobile version