गतिरोधकावरील डांबर गायब

कर्जत-कल्याण राज्यमार्ग बनलाय धोकादायक
सा.बां. विभागाचे निकृष्ट काम
नेरळ | वार्ताहर |
कर्जत-कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर कर्जत पोलीस ठाणे हद्दीत आणि उमरोली ग्रामपंचायत हद्दीत सतत होणारे अपघात लक्षात घेऊन गतिरोधक बसविण्यात आले होते. मार्च 2021 मध्ये रिक्षा जळून झालेल्या अपघातानंतर बसविण्यात आलेले गतिरोधक निकृष्ट कामामुळे निखळून गेले आहेत.
कर्जत-कल्याण राज्यमार्ग सिमेंट काँक्रीटचा तयार करण्यात आल्यानंतर या रस्त्यात सातत्याने अपघात घडत आहेत. त्यात उमरोलीपासून डिक्सळ या भागात तर दररोज वाहनांना अपघात घडत आहेत. त्यात मार्च महिन्यात एका गाडीने धडक दिल्याने प्रवासी रिक्षा जळून खाक झाली होती. त्या रिक्षामधील चालकासह तीन प्रवाशांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर जनतेने सार्वजनिक बांधकाम खात्याविरुद्ध आक्रोश केल्यानंतर बांधकाम खात्याने उमरोली ते डिक्सळ भागात रस्त्यावर गतिरोधक बनवले.
त्यावेळी बांधकाम विभागाने बनवलेले गतिरोधक हे आज दिसेनासे झाले आहेत. गतिरोधक बनविण्यासाठी वापरलेले डांबर हे निकृष्ट दर्जाचे असल्याने पहिल्याच पावसात त्या गतिरोधक यांच्यासाठी वापरलेली डांबर उडून जात होती. आता त्या अर्धवट निघून गेलेल्या डांबरामुळे रस्ता पुन्हा धोकादायक बनला आहे. बांधकाम विभागाने कर्जत पोलिसांच्या सूचनेने बनवलेले गतिरोधक जे नित्कृष्ट दर्जाचे बनवले आणि आज तेच गतिरोधक अपघातास कारणीभूत ठरत आहेत.

आम्ही त्या गतिरोधकांची नोंद घेतली असून, आपल्याकडे कर्जत उपविभागाचा पदभार असून, या गतिरोधकाबाबत कार्यकारी अभियंता यांना पत्र देऊन सूचित केले आहे.
अजयकुमार सर्वगोड, प्रभारी उपअभियंता, सा.बां. विभाग

आम्ही सर्व ग्रामस्थ नेहमीच्या अपघात यांना कंटाळलो होतो आणि वर्गणी गोळा करून गतिरोधक बसविण्याचा निर्णय घेतला होता. पण, आता पुन्हा तसेच करावे लागणार आहे. त्यावर आम्ही पुन्हा एकदा वर्गणी गोळा करण्याचा विचार करू आणि आम्हीच गतिरोधक बनवू.
किशोर गायकवाड, रायगडभूषण

Exit mobile version