स्मशानभूमीच्या दुरवस्थेमुळे तारांबळ

भरपावसात ताडपत्री बांधून अंत्यविधी

| कोलाड | प्रतिनिधी |

रोहा तालुक्यातील नेहरूनगर बाईतवाडी गावातील स्मशानभूमी 2023च्या चक्रीवादळात उध्वस्त झाली. स्मशानभूमीचे लोखंडी पोल पडले असून छप्पर देखील उडाले आहेत. त्यामुळे स्मशानभूमीच्या पायाभूत सुविधा पूर्णपणे बंद झाल्या आहेत. याला दोन वर्षे होऊनही अद्याप प्रशासनाने स्मशानभूमीची कोणतीही दुरुस्त केलेली नाही. त्यामुळे दोन दिवस होत असलेल्या तुफान पावसात एका महिलेच्या अंत्यविधीसाठी गेलेल्या ग्रामस्थांना भर पावसात उभं राहून स्मशानभूमीवर ताडपत्री बांधून अंत्यविधी करावे लागले. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

याविषयी येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत, आमदार, खासदार व लोकप्रतिनिधी यांना वेळोवेळी लेखी तक्रारी दाखल केल्या आहेत. परंतु, प्रशासन गावातील मूलभूत गरजांकडे लक्ष देत नसून त्यांनी ग्रामस्थांना केराची टोपली दाखवली असल्यामुळे ग्रामस्थांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे शासनाने त्वरित स्मशानभूमीची दुरुस्ती करावी, सुरक्षित रस्ता तयार करावा तसेच मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्यावा अन्यथा ग्रामस्थांकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

Exit mobile version