गळक्या शाळांना ताडपत्रीचा आधार

डामसेवाडी, विठ्ठलवाडी शाळांना गळती; ग्रामपंचायतीकडून पत्रे टाकण्याचा निर्णय

। नेरळ । प्रतिनिधी ।

कर्जत तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायतीमधील नांदगाव शाळेच्या पाठोपाठ विठ्ठलवाडी आणि डामसेवाडी या शाळांमध्येदेखील पाण्याची गळती चार वर्षांपासून सुरु आहे. तात्पुरत्या स्वरुपात शाळांवर ताडपत्री टाकण्यात आली आहे. त्या दोन्ही जिल्हा परिषद शाळांच्या इमारतीवर पत्रे बसवावेत, अशी मागणी करणारे निवेदन स्थानिक ग्रामस्थांनी दिली आहेत. दरम्यान, कर्जत पंचायत समितीने नियुक्त केलेले प्रशासक चिंतामण लोहकरे यांनी त्या सर्व शाळांवरील गळती रोखण्यासाठी पत्रे टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायतीमधील नांदगाव शाळेची षटकोनी इमारत गळकी असून, त्यातील एका वर्गात ग्रामपंचायत कार्यालय तर षटकोनी शाळेच्या व्हरांड्यात वर्ग सुरु आहे. त्या गळक्या इमारतीवर पत्रे टाकण्याचा ग्रामपंचायतीचे प्रशासक चिंतामण लोहकरे यांनी घेतला आहे. त्याचवेळी परिसरातील ग्रामपंचायत हद्दीमधील विठ्ठलवाडी आणि डामसेवाडी या शाळांच्या इमारती गेल्या चार वर्षांपासून गळक्या आहेत. त्यातील डामसेवाडी येथे असलेली दोन वर्गखोल्यांची इमारत चार वर्षांपासून पावसाळ्यात गळते आहे. शालेय व्यवस्थापन समिती आणि तत्कालीन उपसरपंच राम खंडवी यांनी स्थानिक व्यावसायिकांची मदत घेऊन शाळेच्या इमारतीवर लोखंडी पत्रे टाकले होते. त्यानंतर दोन वर्षे शाळेची इमारत पावसाळ्यात गळत नव्हती. मात्र, मार्च 2022 मध्ये आलेल्या वादळात डामसेवाडी येथील शाळेच्या इमारतीवरील लोखंडी पत्रे उडून गेले आणि त्या वादळात शाळेच्या शौचालयाची इमारत कोसळली होती. तेव्हापासून शौचालय बंद असून, ते दुरुस्त करण्याचे आणि इमारतीवर पत्रे टाकण्याची मागणी करणारा ठराव नांदगाव ग्रामपंचायतीकडून मंजूर करण्यात आला आहे. तो ठराव ग्रामपंचायतीने कर्जत पंचायत समितीला पाठवला आहे, मात्र शाळा आहे तशीच गळकी असून, तेथे पहिली ते चौथीपर्यंतची 21 विद्यार्थी शिकत आहेत.

तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायतीमधील विठ्ठलवाडी ही तिसरी शाळा असून, तीदेखील चार वर्षांपासून गळकी आहे. त्या ठिकाणी देखील शाळेच्या इमारतीवर पत्रे टाकण्यात यावीत, अशी मागणी शालेय व्यवस्थापन समिती कडून करण्यात आली आहे.नांदगाव ग्रामपंचायतने विठ्ठलवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीवर पत्रे टाकण्यात यावी यासाठी ग्रामपंचायतने कर्जत पंचायत समितीला ठराव पाठवून दिले आहेत. मात्र, कर्जत पंचायत समितीचा शिक्षण विभाग कडून काही कामे केली जात नसल्याने अखेर नांदगाव ग्रामपंचायतीने प्राधान्य देत नांदगाव, विठ्ठलवाडी आणि डामसेवाडी या तिन्ही शाळांच्या छपरावर लोखंडी पत्रे टाकण्याचा निर्णय प्रशासक चिंतामणी लोहकरे यांनी घेतला आहे.

इमारतीवर पत्रे टाकणार
ग्रामपंचायत स्तरावर तिन्ही ठिकाणी स्थानिक ठेकेदार यांच्या माध्यमातून तिन्ही शाळांच्या इमारतीवर पत्रे टाकले जाणार आहेत. त्यामुळे शाळेचे वर्ग पावसाच्या पाण्यात गळके राहणार नाहीत, असे श्री. लोहकरे यांनी सांगितले. त्यासाठी लोहकरे यांनी कर्जत पंचायत समितीचे गटअधिकारी चंद्रकांत साबळे, गटशिक्षण अधिकारी संतोष दौंड यांच्यासोबत चर्चा करून निर्णय घेतला आहे.

Exit mobile version