टाटा पॉवर प्रकल्पामुळे घरांना तडे

सुरुंग स्फोटांनी आदिवासी वाडी दहशतीत; पुनर्वसनाची जोरदार मागणी

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील भिवपुरी ग्रामपंचायत हद्दीत उभारल्या जात असलेल्या टाटा पॉवर कंपनीच्या नव्या प्रकल्पाने स्थानिक आदिवासी ग्रामस्थांचे जगणे अक्षरशः असह्य केले आहे. गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या सततच्या सुरुंग स्फोटांमुळे तापकीरवाडीतील घरांना मोठमोठे तडे गेले असून, काही ठिकाणी थेट घरांवर आणि अंगणात दगड कोसळत आहेत. या भीषण प्रकारामुळे संपूर्ण वाडी भीतीच्या छायेत जगत असून, “आता इथे राहायचं तरी कसं?” असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून केला जात आहे.

सुमारे 100 वर्षांपूर्वी टाटा कंपनीने कर्जत परिसरातील पाण्याचा वापर करून वीज निर्मिती प्रकल्प उभारला होता. आता त्याच प्रकल्पालगत असलेल्या ओसाड जमिनीवर साठवण तलाव उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तब्बल 65 एकर परिसरात खोल खड्डा खोदून धरण उभारले जात असून, यासाठी मोठ्या प्रमाणात उत्खनन आणि दगडफोडी सुरू आहे. मे 2025 पासून दररोज सुरुंग स्फोट घडवले जात आहेत. या कामाच्या अगदी शेजारी असलेल्या तापकीरवाडीमध्ये 22 आदिवासी कुटुंबे वास्तव्यास आहेत आणि याच कुटुंबांचे आयुष्य धोक्यात आले आहे.

सततच्या स्फोटांमुळे घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत, छतं हादरतात, तर काही वेळा दगड थेट घरांवर येऊन कोसळतात. जीव मुठीत धरून राहणाऱ्या या कुटुंबांची अवस्था दयनीय झाली आहे. “हा विकास आमच्या जिवावर उठलाय,” अशी भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. कंपनीकडून सुरुंग स्फोटापूर्वी सूचना दिल्या जातात, असा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात हे प्रमाण अत्यल्प जेमतेम 5 टक्के असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. अनेकदा संतप्त ग्रामस्थांनी कंपनीत घुसून जाब विचारला, तर काहींनी स्फोटस्थळी रात्र काढून आंदोलन केले. त्यावेळी “आता स्फोट होणार नाहीत” अशी आश्वासने दिली गेली, पण प्रत्यक्षात दुसऱ्याच दिवशी पुन्हा स्फोट सुरू झाले, असा गंभीर आरोप गुलाब वाघमारे यांनी केला आहे.

दरम्यान, ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच कुंदा मोरमारे यांच्या घरावर थेट मोठा दगड कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. या दुर्घटनेत त्यांची मुलगी जखमी झाली, मात्र कंपनीकडून साधी वैद्यकीय मदतही देण्यात आली नाही, असा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे कंपनीच्या संवेदनशून्यतेवर तीव्र संताप व्यक्त होत आहे.

सध्या धरणाच्या कामाचा अवघा 25 ते 30 टक्के भाग पूर्ण झाला असून, पुढील किमान वर्षभर स्फोट सुरू राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे “आम्हाला इथून तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवा” अशी मागणी तापकीरवाडीतील ग्रामस्थ सातत्याने करत आहेत. मात्र, कंपनी प्रशासन केवळ आश्वासनांची खैरात करत असून, प्रत्यक्षात कोणतीही ठोस पावले उचलली जात नसल्याचा आरोप आहे.

या कुटुंबांना धोका
आकाश हिलम, संतोष शिद, दत्ता हिलम, मंगेश शिद, विलास शिद, दक्षता शिद, गुलाब वाघमारे, लहू शिद, अंकुश वाघमारे, रमेश शिद, विजय वाघमारे, महादू शिद, भगवान शिद, गंगाराम वाघमारे आदी कुटुंबे थेट संकटाच्या छायेत राहत आहेत.

सतत होणारे स्फोट आणि रात्रभर धावणाऱ्या अवजड गाड्यांमुळे झोप उडाली आहे. आम्ही रोज भीतीत जगतो. आमचे तात्काळ सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करा.

आकाश हिलम,
ग्रामस्थ

कंपनी वारंवार खोटी आश्वासने देते. ‌‘स्फोट बंद करतो’ म्हणतात आणि दुसऱ्याच दिवशी पुन्हा स्फोट सुरू होतात. आमच्या जीवाची कोणालाच पर्वा नाही.

गुलाब वाघमारे,
ग्रामस्थ
Exit mobile version