अमेरिकन खेळाडूशी सामना झाला ड्रॉ; राऊंड-4 मध्ये अर्जुन एरिगैसीकडून आनंद पराभूत
| कोलकाता | वृत्तसंस्था |
कोलकाता येथे सुरू असलेल्या टाटा स्टील चेस इंडिया रॅपिड स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी, भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद आणि अमेरिकन खेळाडू वेस्ली सो यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात पंचांच्या निर्णयावरून मोठा वाद निर्माण झाला. सामन्यादरम्यान प्रज्ञानंदने पुढील चाल न खेळताच घड्याळ थांबवले आणि पंचांकडे (निर्णायक) मदत मागितली. यानंतर पंचांनी सामना ड्रॉ (बरोबरी) घोषित केला. या निर्णयावर बुद्धिबळ जगतात प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
आर. प्रज्ञानंदने सामन्याच्या शेवटच्या क्षणी आपला प्यादा प्रमोशन (राणी बनवण्याच्या) स्थितीत पुढे सरकवला होता. पण घड्याळात खूप कमी वेळ शिल्लक होता आणि तो प्याद्याला राणीमध्ये बदलू शकला नाही. वेळ संपण्यापूर्वी बरोबर एक सेकंद आधी प्रज्ञानंदने घड्याळ थांबवले आणि पंचांची मदत मागितली. यावेळी समालोचक आणि प्रेक्षकांना वाटले की, वेळ संपल्यामुळे वेस्ली सोला विजय मिळेल, पण दीर्घ चर्चेनंतर पंचांनी सामना ड्रॉ घोषित केला.
या निर्णयावर प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ पंच क्रिस बर्ड यांनी तीव्र टीका केली. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर लिहिले, महासामना पराभव मानला जायला हवा होता. नियम 6.11.2 नुसार, खेळाडू घड्याळ तेव्हाच थांबवू शकतो जेव्हा प्रमोशन झाले असेल आणि आवश्यक मोहरा उपलब्ध नसेल. येथे प्रमोशन झालेच नाही, त्यामुळे हा नियम लागू होत नाही. अनेकांचे असे मत आहे की प्रज्ञानंदने हा सामना पराभव मानला पाहिजे होता. मात्र, वेस्ली सो म्हणाला की ही घटना अनवधानाने घडली आणि त्याला बोर्डवर खेळून जिंकणे आवडते, त्यामुळे त्याने विजयाचा दावा केला नाही.
दरम्यान, पाच वेळा विश्वविजेते ठरलेल्या विश्वनाथन आनंद यांना अर्जुन एरिगैसीविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. चौथ्या फेरीत आनंद चांगल्या स्थितीत होते, परंतु एका चुकीच्या चालीमुळे अर्जुनने सामन्याचे चित्र पालटले आणि विजय मिळवला. मात्र, यानंतर आनंदने शानदार पुनरागमन केले. त्यांनी हांस नीमन आणि वोलोडार मुर्जिन यांना हरवून 4.5 गुण मिळवले आणि संयुक्त आघाडी घेतली.
आनंदसोबत युवा भारतीय खेळाडू निहाल सरिनही 4.5 गुणांवर आहे. निहालने दिवसाचे तिन्ही सामने जिंकले.त्याने नीमन आणि मुर्जिनच्या चुकांचा फायदा घेतला आणि विदित गुजराथीला एंडगेममध्ये हरवले. महिला गटात रशियाची कॅटेरिना लाग्नो सहा फेऱ्यांनंतर 4.5 गुणांसह अव्वल स्थानी आहे. भारतीय खेळाडूंमध्ये वंतिका अग्रवाल तीन गुणांसह पाचव्या स्थानावर आहे, तर हरिका द्रोणावल्ली, आर. वैशाली आणि रक्षिता रवी अजूनही विजेतेपदाच्या शर्यतीत आहेत.







