निलकंठ दिवेकरांचे जोरदार टीकास्त्र
| पेण | प्रतिनिधी |
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगड मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना खारेपाटातील पाणीप्रश्नाची आता आठवण झाली आहे. तटकरेंनी आपल्या खासदारकी आणि राज्यात मंत्री असतानाच्या कार्यकाळात येथील पाणीप्रश्नासाठी काहीच केले नाही. एक छदामही दिला नसताना, आता श्रेय घेण्यासाठी पुढे येत आहेत, अशी टीका शेकापचे युवा नेते तथा पेण पंचायत समितीचे सदस्य निलकंठ दिवेकर यांनी केली आहे. पाणीप्रश्नावर समाजमाध्यमांवर सुरू असलेल्या श्रेयवादावर त्यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेत शेतकरी कामगार पक्षाने येथील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी आवाज उठविल्याची रोखठोख प्रतिक्रिया दिवेकर यांनी ‘कृषीवल’ला दिली.
पेण खारेपाटाच्या पाणीप्रश्नावर सध्या तरी समाजमाध्यमांवर श्रेयवादाची ठिणगी पडली आहे. खासदार सुनील तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे खारेपाटातील पाणीप्रश्न सोडवण्याचा श्रेय घेण्यासाठी हापापलेले दिसत आहेत. समाजमाध्यमांवर न केलेल्या कामांचे श्रेय घेत आहेत. परंतु, सुनील तटकरे यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असल्यापासून आतापर्यंत छदामभर पैसासुद्धा खारेपाटाचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी खर्च केलेला नाही आणि आज कागदी घोडे नाचवून श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात, असा आरोपही दिवेकर यांनी केला आहे. तर, दुसरीकडे आमदार रविशेठ पाटील यांच्या सूनबाई प्रीतम पाटीलही आपल्या फेसबुक व इंस्टाग्रामवरून आपल्या सासऱ्यांनी पाणीप्रश्न सोडवल्याचा गाजावाजा करत आहेत. परंतु, खारेपाटासाठी ना कॉंग्रेस, ना राष्ट्रवादी, ना भाजपने अथवा यांच्या नेत्यांनी पाणीप्रश्न सुटावा म्हणून प्रामाणिक प्रयत्न केले नाहीत, असे परखड मत दिवेकर यांनी व्यक्त केले.
खा. सुनील तटकरे हे या राज्याचे कित्येक वर्षे मंत्री होते, तर जिल्ह्याचे पालकमंत्री होते. काही काळ राज्याची तिजोरी सुनील तटकरे यांच्या ताब्यात होती, मग त्यावेळी खारेपाटातील पाणीप्रश्न का आठवला नाही. आता यांना लोकसभेला मतं हवीत म्हणून खारेपाटातील पाण्ाीप्रश्न आठवला का, असा सवाल दिवेकर यांनी केला आहे. गेल्या पाच वर्षांत स्वतः खासदारांंची कन्या आदिती तटकरे जिल्ह्याच्या पालकमंत्री, कॅबिनेट मंत्री आहेत, त्यांनी आतापर्यंत खारेपाटातील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला का, याचे उत्तर खासदारांकडे आहेत का? पाणीप्रश्न सोडाच, खासदारसाहेबांनी गेल्या पाच वर्षांत किती वेळा जनतेच्या भेटीगाठी घेतल्या, याचे उत्तर तरी त्यांच्याकडे आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
श्रेयासाठी जनतेची दिशाभूल पेण तालुक्यातील खारेपाटाचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी निधीची उपलब्धता एमएमआरडीमधून होईल, याबाबत सखोल माहिती मुख्यमंत्र्यांना दिली आणि नंतर मुख्यमंत्र्यांनी ते मान्य करून तशा प्रकारचा आदेश दिला. त्या निधीचा योग्य वापर करता आलाच नाही म्हणून आजतागायत खारेपाटाचा पाणीप्रश्न रेंगाळत पडलाय. महत्त्वाची बाब म्हणजे, हेटवणे सिंचन क्षेत्राखाली खारेपाटातील जमीन असताना पाणी उपलब्ध झाले नाही. राज्याचे सिंचन मंत्री तटकरे साहेब होते, मग का कालव्याची कामे पूर्ण झाली नाहीत. अर्थ खाते, सिंचन खाते आपल्याकडे होते, मग त्यावेळेला खारेपाटचा प्रश्न का सोडवता आला नाही. जर कुणी श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असेल, तर ते चुकीचे आहे. खारेपाटातील जनता सुज्ञ आहे, आगामी लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या माध्यमातून योग्य ते उत्तर देतीलच. परंतु, खासदारसाहेबांच्या बगलबच्च्यांना एवढेच सांगणे आहे, चुकीच्या पध्दतीने समाजमाध्यमांवर लोकांची दिशाभूल करणारे मेसेज फिरवत आहात ते थांबवा, कारण येथील जनतेला सगळं माहिती आहे, असे निलकंठ दिवेकर म्हणाले.







