मुरुड समुद्र किनारी ऑइलचे तवंग

। मुरुड जंजिरा । वार्ताहर ।
मुरुड समुद्र किनारी पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात ऑइल वाहून आले असून सदरचा समुद्र किनारा मोठ्या प्रमाणात विद्रुप झाला आहे. मुरुड शहराला अडीच किलोमीटर एवढा समुद्र किनारा लाभला असून यावेळी ऑइल येण्याचे प्रमाण दुपट्टीने वाढल्याने संपूर्ण किनार्‍यावर ऑइलचे गोळेच गोळे दिसत आहेत. तर ज्या ठिकाणी दगडाची संरक्षक भिंत आहे तिथे फक्त ऑइलच दिसून येत आहे. खोल समुद्रातून वाहून आलेले ऑइल वाळूत मिसळल्यामुळे त्याचे गोळे तयार झाले आहेत. हे गोळे संपूर्ण समुद्र किनारी पसरल्यामुळे किनारा विद्रुप झाला आहे. मुरुड समुद्रकिनारी डांबर सदृश्य चिकट जाडसर ऑइल मोठ्या प्रमाणात वाहून आल्याने मच्छिमारांनी चिंता व्यक्त केली आहे. खोल समुद्रातील मासेमारी सध्या बंद असली तरी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी समुद्र किनारी जाळी टाकून मासेमारी करतात. परंतु या वाहून आलेल्या खराब ऑइलमुळे समुद्रातील पाणी दूषित होते व मासे दूर खोल समुद्रात जातात. परिणामी किनार्‍यावरील मासेमारीवर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे स्थानिक मच्छिमारांसोबत याचा त्रास अनेकांना सहन करावा लागत आहे.

Exit mobile version