विद्यार्थ्यांसह शिक्षकाचा जोगेश्वरी कुंडात बुडून दुर्दैवी मृत्यू

 | छ. संभाजीनगर | प्रतिनिधी |

खाजगी क्लासेसचे 9 विद्यार्थी शिक्षकांसोबत वेरूळ लेणी बघण्यासाठी गेले असता दुर्दैवी घटना घडली आहे. विद्यार्थी शिक्षकांसह लेणी बघून जोगेश्वरी कुंडाकडे गेले आणि तिथे एक विद्यार्थी पाय घसरून कुंडात बुडाला. विद्यार्थ्याला वाचवण्यासाठी शिक्षकाने उडी घेतली. मात्र, याचवेळी घाबरलेल्या विद्यार्थ्याने शिक्षकाला मिठी मारली. यात शिक्षक व विद्यार्थी अशा दोघांचाही बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना वेरूळ लेणी परिसरातील जोगेश्वरी कुंडात रविवारी (दि.24) घडली. चेतन पगडे (17), रा. बिल्डा ता.फुलंब्री, राजवर्धन वानखेडे (29), रा. चिखली बुलढाणा असे मृत झालेल्या शिक्षक व विद्यार्थ्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वेरूळ लेणी बघण्यासाठी विटखेडा येथील खाजगी क्लासेसच्या 9 विद्यार्थ्यांसह शिक्षक राजवर्धन वानखेडे हे स्कूल बसने गेले. वेरूळ लेणी बघितल्यानंतर ते डोंगरावरील जोगेश्वरी कुंडाकडे गेले. कुंडाजवळ उभा असताना विद्यार्थी चेतन पगडे याचा पाय घसरून तो कुंडात पडला. चेतन कुंडात बुडत असल्याचे शिक्षक वानखेडे यांच्या लक्षात आले. त्यांनी प्रसंगावधान दाखवत आपल्या विद्यार्थ्याला वाचवण्यासाठी कुंडात उडी घेतली. मात्र, पाण्यात बुडताना घाबरलेल्या चेतनने शिक्षकाला मिठी मारली. यामुळे दोघे पाण्यात बुडाले. कुंडाच्या परिसरामध्ये असलेल्या गुराख्यांना ही माहिती मिळताच त्यांनी तात्काळ कुंडाजवळ धाव घेत दोघांना बाहेर काढले. रुग्णवाहिकेच्या माध्यमातून दोघांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

मूळचं फुलंब्री तालुक्यातील पगडे कुटुंब मुलांच्या शिक्षणासाठी मामाच्या विठ्ठला गावात गेल्या काही दिवसांपासून राहत आहे. मृत चेतनचे वडील वाहन चालक आहे तर त्याची आई घरकाम करते. त्याला एक मोठी बहीण असून, ती बीकॉमचे शिक्षण घेत आहे. चेतन हा त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. तो सध्या देवगिरी महाविद्यालयातील विज्ञान शाखेत शिक्षण घेत होता. शिक्षकासोबत एकुलता एक मुलगा गेल्याने गावात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Exit mobile version