अलिबागमधील शिक्षकाला पावणे तीन लाखांचा गंडा

फॉरेक्स गुंतवणुकीच्या आमिषाने आर्थिक फसवणूक; अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

अलिबागमधील एका माध्यमिक शिक्षकाला दोन लाख 71 हजार 500 रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. फॉरेक्समधील गुंतवणुकीवर दर महिन्याला सात ते आठ टक्के मासिक परताव्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात अंबरनाथ येथील प्रमोद जैसवाल यांच्याविरोधात लेखी तक्रार देण्यात आली आहे.

महेंद्र पाटील असे या शिक्षकाचे नाव आहे. मागील तीन वर्षापासून अलिबागमध्ये ते नोकरीनिमित्त राहत आहेत. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, ऑगस्ट 2024 मध्ये अलिबाग येथील हॉटेल रविकिरण येथे आयोजित बैठकीत प्रमोद जैसवाल याने शिक्षकांना फॉरेक्स (फॉरेन एक्सचेंज) गुंतवणूक योजनेची माहिती दिली होती. बॉट ब्रो नावाची कंपनी स्थापन केली असून, कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित सॉफ्टवेअरच्या माध्यमातून दरमहा सात ते आठ टक्के परतावा मिळेल, असे आश्वासन त्याने दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या आश्वासनावर विश्वास ठेवून तक्रारदार यांनी ऑक्टोबर 2024 मध्ये टप्प्याटप्प्याने गुगल पेच्या माध्यमातून 2 लाख दहा हजार रुपये जैसवाल याला पाठवले. सुरुवातीचे सहा महिने त्यांना नियमित परतावा मिळाला. त्यानंतर संबंधित योजनेचे नाव बदलून अल्फा बॉट आणि पुढे कॉस मार्केट असे करण्यात आले. तसेच परतावा अमेरिकी डॉलरमध्ये देण्यास सुरुवात झाली. त्यानंतर जून्या योजनेत बदल करून क्रॉॅस मार्केट असे कंपनीचे नाव ठेवण्यात आले. ऑक्टोबर 2025 मध्ये त्यांनी पुन्हा 50 हजार रुपयांची गुंतवणूक केली. योजनेच्या नूतनीकरणासाठी त्यांनी आणखी 11 हजार 500 रुपये दिले. अशा प्रकारे त्यांनी एकूण 2 लाख 71 हजार 500 रुपयांची गुंतवणूक केली. मात्र, नोव्हेंबर 2025 पासून त्यांना मिळणारा परतावा अचानक बंद झाला. परतावा बंद झाल्याबाबत जाब विचारल्यानंतर जैसवाल याने समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यानंतर त्याने त्यांचा मोबाईल क्रमांक ब्लॉक करून संपर्क तोडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदार यांनी आर्थिक व्यवहारांचे पुरावे सादर करत अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी अलिबाग पोलीस पुढील तपास करत आहेत.

Exit mobile version