शिवीगाळ, मारहाणीसह अनोळखी व्यक्तींमार्फत अत्याचार
। उरण । प्रतिनिधी ।
शिक्षक ही समाजातील सर्वाधिक सन्माननीय भूमिका; परंतु उरण तालुक्यातील एका शिक्षकानेच या पदाचे पावित्र्य चिरडून टाकले आहे. जासई येथील एका हायस्कूलमधील शिक्षक सुहास शिंदे यावर स्वतःच्या मेहुण्याच्या पत्नीचा विनयभंग, शिवीगाळ, मारहाण आणि अनोळखी व्यक्तींमार्फत बळजबरीने अत्याचार करवून घेतल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर शिक्षक, त्याची पत्नी आणि मेव्हणा यांच्यासह एकूण पाच जणांवर न्हावा शेवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक मोनाली चौधरी करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शिक्षक सुहास शिंदे याने आपल्या मेहुण्याच्या पत्नीला व नातेवाईकांना ‘मुंबई फिरायला’ म्हणून बोलावले. मात्र फिरायला नेण्याऐवजी त्याने त्यांना उरण येथील जेएनपीए कामगार वसाहतीतील भाड्याच्या घरात आणले. तिथे या मास्तरने स्वतःच्या मेहुण्याच्या पत्नीचा विनयभंग करून शिवीगाळ व मारहाण केली. एवढ्यावर न थांबता, रात्री दहा ते अकरा वाजताच्या सुमारास दोन अनोळखी व्यक्तींना घरात बोलावून त्यांच्याकडून पैसे घेतले आणि त्या महिलेला त्यांच्या तावडीत सोपवले, असा भयंकर आरोप संबंधित महिलेने केला आहे.
या प्रकरणाची साक्ष महिलेची नणंद असल्याचे सांगण्यात आले आहे. आरोपी सुहास शिंदे, प्रविण राजाराम गजांकूश आणि दोन अनोळखी व्यक्ती अशा पाच जणांवर गुन्हा दाखल झाला असून, न्हावा शेवा पोलीस ठाण्यात त्यांची चौकशी सुरू आहे. तथापि, अद्याप कुठल्याही आरोपीला अटक झालेली नाही, अशी माहिती तपास अधिकारी चौधरी यांनी दिली आहे.
दरम्यान, आरोपींकडून फिर्यादी महिलेविरुद्ध सातारा जिल्ह्यातील शाहू पोलिस ठाण्यात चोरी आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल असल्याचे समोर आले आहे. मात्र, या आरोपांचा आधार घेऊन महिला तक्रारीचे गांभीर्य कमी करता येणार नाही, असा जनमतात सूर आहे.
या प्रकरणानंतर उरणच्या शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली असून, समाजमन संतप्त झाले आहे. शिक्षकासारख्या जबाबदार पदावर असलेल्या व्यक्तीकडून असं कृत्य झाल्याने पालक आणि नागरिकांमध्ये संताप उसळला आहे.
‘विद्यार्थ्यांना संस्कार देणारा शिक्षकच राक्षसी कृत्य करतो, तर समाजाचं भविष्य कोण घडवणार?’, असा जळजळीत सवाल उरणभर गुंजत आहे.







