रायगडमधील अनुदानित शाळांमध्ये तासिका विस्कळीत
। रायगड | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील अनुदानित माध्यमिक शाळांमध्ये गेल्या दहा वर्षांपासून नियमित शिक्षक भरती न झाल्याने शिक्षण व्यवस्थेवर गंभीर परिणाम होत आहे. शैक्षणिक वर्ष सुरू होऊन दीड महिना उलटला असतानाही अनेक शाळांमध्ये नियमित वेळापत्रकानुसार अध्यापन सुरू होऊ शकलेले नाही. गणित, विज्ञान, इंग्रजी यांसारख्या महत्त्वाच्या विषयांचे शिक्षक उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, शाळा व्यवस्थापनही अडचणीत सापडले आहे.
2017 पूर्वी रिक्त पदांवर शिक्षकांची नियुक्ती करण्याचे अधिकार संबंधित शाळा व्यवस्थापनाकडे होते. मात्र, शासनाने पवित्र पोर्टल प्रणाली लागू केल्यानंतर भरतीची जबाबदारी शासनाकडे वर्ग करण्यात आली. त्यानंतर अनेक रिक्त पदे वर्षानुवर्षे भरली गेली नसल्याने शिक्षकांची संख्या सातत्याने घटत आहे.
सध्या रायगड जिल्ह्यातील अनुदानित माध्यमिक शाळांमध्ये केवळ 1 हजार 908 शिक्षक कार्यरत असून, त्यामध्ये सुमारे 278 मुख्याध्यापकांचा समावेश आहे. परिणामी अनेक ठिकाणी एका शिक्षकावर दोन ते तीन विषय किंवा वर्गांची जबाबदारी आली आहे. काही शाळांमध्ये संगीत शिक्षकांना गणिताचे तास घ्यावे लागत असल्याचे चित्र असून त्यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
यातच मतदार यादी पुनरिक्षण (एसआयआर) मोहिमेसाठी मोठ्या प्रमाणावर शिक्षकांची नियुक्ती करण्यात आल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. सुमारे 60 टक्के शिक्षक या कामात गुंतल्यामुळे अनेक शाळांमध्ये नियमित तासिकाच होत नसल्याची तक्रार पालकांकडून करण्यात येत आहे. गणित, विज्ञान आणि इंग्रजी यांसारख्या विषयांसाठी अनुभवी व विषयतज्ज्ञ शिक्षकांची आवश्यकता असते. मात्र, रिक्त पदांमुळे अनेक विद्यार्थ्यांना अपेक्षित दर्जाचे अध्यापन मिळत नसल्याने त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत आहे.
विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी काही शिक्षण संस्था तात्पुरत्या स्वरूपात शिक्षकांची नियुक्ती करतात. मात्र, शासनाकडून नियमित शिक्षक नियुक्त झाल्यानंतर या शिक्षकांच्या सेवांबाबत वाद निर्माण होतात आणि अनेक प्रकरणे न्यायालयात जात असल्याने संस्था चालकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
पवित्र पोर्टलवर आवश्यक शिक्षकांची मागणी नोंदविण्यात आली असून, मतदार पुनरिक्षण मोहिमेमुळे शिक्षकांची कमतरता अधिक जाणवत आहे. पुढील एक ते दोन महिन्यांत शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण होईल.
महारुद्र नाळे,
माध्यमिक शिक्षणाधिकारी
