गुरूजींच्या बदल्यांचा मार्ग मोकळा

| पेण | वार्ताहर |
गेल्या महिन्याभरापासून लक्ष लागलेल्या शिक्षक बदलीसाठीच्या पोर्टलचे गुरुवारी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते यशस्वी लॉचिंग झाले. त्यामुळे आता शिक्षक बदलीचा मार्ग मोकळा झाला आहे. तीन टप्प्यात केल्या जाणार्‍या या बदली प्रक्रियेत पहिल्या टप्प्यात शुक्रवारपासून आठ दिवस शिक्षक प्रोफाईल अद्ययावतीकरण केले जाणार आहे. दरम्यान, जिल्ह्यातील 3,687 शाळांमधील एकूण 20,169 शिक्षकांचा समावेश आहे. यामध्ये जिल्हा परिषदेचे 6,483 शिक्षक आपले प्रोफाईल अपडेट करणार असून, यातून शासन निर्णयानुसार 10 टक्क्यांप्रमाणे शिक्षक बदलीस पात्र ठरणार आहेत.

गेल्या दोन वर्षांपासून शिक्षकांना बदल्यांचे वेध लागले आहेत. यावर्षी शिक्षक बदल्यांमध्ये पारदर्शकता यावी, यासाठी ग्रामविकास विभागाने शिक्षक बदल्या या विशिष्ट सॉफ्टवेअरच्या माध्यमातून पोर्टलद्वारे ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, शासनाने खासगी कंपनीकडून सॉफ्टवेअरची निर्मिती केली आहे. मात्र, त्याची चाचणी होत नसल्याने अनेक दिवसांपासून बदली प्रक्रिया लांबताना दिसत होती. अखेर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शिक्षक बदलीच्या पोर्टलने लाँचिंग केले आहे. त्यामुळे आता शिक्षक बदल्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. यावेळी व्ही.सी.द्वारे सी.ई.ओ. यांच्यासह शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पहिल्या टप्प्यात शिक्षक माहिती अद्ययावतीकरण, दुसर्‍या टप्प्यात आंतरजिल्हा बदल्या आणि तिसर्‍या टप्प्यात जिल्हांतर्गत बदल्या केल्या जाणार आहे. जिल्हा परिषद कर्मचार्‍यांना आंतरजिल्हा बदलीने अन्य जिल्हा परिषदेमध्ये नेमणूक करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. त्यामुळे आत्ता शिक्षकांची धडधड वाढली असून, या शिक्षक बदल्यांमध्ये राजकीय ढवळाढवळ होणार नाही. त्यामुळे राजकीय पुढार्‍यांची चमचेगिरी करणार्‍या मास्तरांना चांगलाच चाप बसणार आहे.

Exit mobile version