। उरण । प्रतिनिधी ।
अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ शाखा उरणच्या वतीने शिक्षक वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षपद उरण पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी निर्मला घरत यांनी भूषविले. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, सरस्वती माता व दादासाहेब दोंदे यांच्या प्रतिमेचे पूजनाने झाली. त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या वर्धापनदिनी संघटनेच्यावतीने तालुक्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या प्रत्येक केंद्रातून एक अशा पाच उत्कृष्ट शिक्षिकेंचा आदर्श शिक्षिका म्हणून गौरव करण्यात आला. तसेच उरण तालुक्यातून सेवानिवृत्त झालेल्या सर्व सेवानिवृत्त बंधू-भगिनींचा देखील शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे तालुक्यातून शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांचा देखील यथोचित सन्मान करण्यात आला. त्यानंतर अनेक मान्यवरांनी या संघटनेबद्दल व त्यांनी सुरू ठेवलेल्या स्तुत्य अशा उपक्रमाबद्दल गौरवोदगार काढले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा निर्मला घरत यांनी या संघटनेचा इतिहास तसेच कार्य यांची प्रशंसा केली शिक्षकांसाठी अहोरात्र झटणारी संघटना म्हणून या संघटनेचे कार्य अतुलनीय आहे. त्याचप्रमाणे विविध उपक्रम राबवून ही संघटना शिक्षकांची एक प्रेरणा देणारी संघटना आहे, असे देखील गौरवोदगार काढले.







