खालापूरात शिक्षक दिनाचे आयोजन

| पाताळगंगा | प्रतिनिधी |

“आई-वडील जन्म देऊन संगोपन करतात; मात्र, शिक्षक विद्यार्थ्यांना जीवन जगण्याची योग्य दिशा देतात. शिक्षक केवळ पुस्तकातील धडे शिकवत नाहीत, तर प्रामाणिकपणा, शिस्त, संस्कार, वेळेचे महत्त्व आणि चांगला माणूस होण्याची शिकवण देतात. त्यामुळे तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले, तरी शिक्षकांचे महत्त्व कधीही कमी होणार नाही, असे गौरवोद्गार सभापती कृष्णा पारंगे यांनी व्यक्त केले. यावेळी भारताचे महान शिक्षक, तत्त्वज्ञ व माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी (दि.5) शिक्षक दिन साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्य गौरी गडगे, प्रमिला पाटील, कमला भस्मा, देवयानी देशमुख, जिल्हा परिषद सदस्य तथा गटनेते संतोष बैलमारे, रेश्मा पाटील, सामाजिक कार्यकर्ते कैलास म्हात्रे, महादेव गडगे, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रदीप कांबळे, गटशिक्षणाधिकारी राजवर्धन नाईक, पोषण आहार अधीक्षक दीपा परब, वरिष्ठ विस्तार अधिकारी शिल्पा दास आदी उपस्थित होते. सभापती कृष्णा शेठ पारंगे यांच्या संकल्पनेतून शिक्षक दिनानिमित्त खालापूर तालुक्यात गेल्या 25 वर्षांत प्रथमच शिक्षक गौरव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तालुक्यातील प्रत्येक केंद्रातून दोन ज्येष्ठ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच, तालुक्यातील सर्व शिक्षकांना आदर्श शिक्षक प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.

Exit mobile version