आरडीसीसी बँकेच्या माध्यमातून शिक्षकांची दिवाळी गोड; आ. जयंत पाटील यांचा दिलासा

बिनव्याजी २५,००० पर्यंत रक्कम तातडीने उपलब्ध करून देणार

| अलिबाग | प्रतिनिधी |

शासनाने राज्यातील शिक्षकांचे दिवाळीसाठी वेतन न दिल्याने शिक्षकांची दिवाळी अंधारात जाणार असल्याची परिस्थिती निर्माण झालेली असताना, अशा परिस्थितीत रायगड जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन आमदार जयंत पाटील यांनी ज्या प्राथमिक शिक्षकांची खाती रायगड जिल्हा सहकारी बँकेमध्ये आहेत त्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. त्या शिक्षकांच्या खात्यामध्ये दिवाळीसाठी बिनव्याजी कमीतकमी ऍडव्हान्स रुपये १०,०००/- (दहा हजार) आणि जास्तीत जास्त २५,००० /- ( पंचवीस हजार रुपये ) जमा केले जाणार आहेत. ज्यांचे पगाराचे खाते आरडीसीसी बँकेत आहेत त्यांनी मंगळवारी सकाळी शाखेत जाऊन मागणी अर्ज सादर करावा, त्यांच्या करिता तातडीने आवश्यक ती रक्कम उपलब्ध करून देण्याची व्यवस्था बँकेच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचे राजाध्यक्ष तथा रायगड जिल्हा सहकारी पतपेढी लिमिटेड अलिबागचे चेअरमन राजेश सुर्वे यांनी शिक्षकांचे वेतन न झाल्याने आर्थिक समस्या निर्माण झालेली असताना, याकरिता बॅकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक आणि विभागीय अधिकारी संजय देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांनी आरडीसीसी बॅंकेचे चेअरमन आमदार जयंत पाटील यांच्याशी संपर्क साधून शिक्षकांची समस्या त्यांच्यासमोर मांडली. आमदार जयंत पाटील यांनी या निर्णयाला तात्काळ सकारात्मकता दर्शवली आणि शिक्षकांना बिनव्याजी रक्कम उपलब्ध करून घ्यायच्या सूचना केल्या.

बँकेचे चेअरमन आमदार जयंत पाटील आणि संचालक मंडळ यांच्या या गोड दिवाळी भेटीचा आनंद सर्व शिक्षकांना होणार असून त्यानिमित्ताने बँकेचे आम्ही आभार व्यक्त करतो अशा भावना राजेश सुर्वे यांनी व्यक्त केल्या. तसेच रायगड जिल्हा सहकारी बँकेकडे आल्यानंतर आम्हाला समाधान मिळणार याची खात्री असतेच, त्यामुळे बँकेच्या या निर्णयाचा आनंद जिल्ह्यातील हजारो शिक्षकांना होईल त्याबाबत राजेश सुर्वे यांनी समाधान व्यक्त केले.

Exit mobile version