श्रीकृपा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षक दिन साजरा
| चौल | प्रतिनिधी |
विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देण्याचे व त्यांना घडवण्याचे काम शिक्षक करत असतात. शिक्षिकी पेशा हा अतिशय पवित्र पेशा आहे. विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार, उकार व ज्ञान देण्याचे पवित्र कार्य ते करतात, अशा भावना पालकांनी व्यक्त केल्या. रेवंदडा येथील श्रीकृपा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षक दिनाचे औचित्य साधत सोमवारी (दि. 8) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना बोलण्याची संधी देण्यात आली होती. यावेळी उपस्थित पालकांनी आपले विचार मांडले.
शिक्षणाचा पाया मजबूत असेल, तर विद्यार्थ्यांना पुढे जाऊन कोणतीही अडचण येत नाही, हे खरं करुन दाखविण्याचे काम श्रीकृपा इंग्लिश मीडियम, रेवदंडा स्कूलने केल्याचे यावेळी पालकांनी सांगितले. प्ले ग्रुप ते सिनिअर केजीपर्यंत या स्कूलमध्ये मुख्याध्यापिका रिया प्रशांत झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांचा शिक्षणाचा पाया मजबूत करण्याचे, त्यांना संस्कारपूर्ण शिक्षण देण्याचे काम येथील शिक्षक करीत आहेत. मुलांमध्ये लहानपणापासूनच सभाधीटपणा यावा, याच उद्देशाने पालकांच्या सोबतीने मुलांना शिक्षक दिनाचे औचित्य साधून बोलण्याची संधी देण्यात आली होती. दरम्यान, शाळेतील सर्वच मुलांनी आपल्या पालकांच्या सोबतीने शिक्षक दिन आणि आपल्या शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी मुख्याध्यापिका रिया प्रशांत झावरे, शिक्षिका निधी गुप्ता, प्रीती म्हात्रे, अंकिता नाईक, श्वेता ठाकूर यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी संगिता गोंधळी, संपदा मानकर यांना विद्यार्थ्यांनी गुलाबपुष्प देत नमस्कार केला. दरम्यान, उपस्थित पालकांनी शिक्षक मुलांना शिकविण्यासाठी घेत असलेल्या मेहनतीबद्दल, शाळेत राबविण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमांबाबत कौतुक केले.
