साक्षरता मोहिमच्या कामाला शिक्षकांचा विरोध

| अलिबाग | प्रतिनिधी |

नवभारत साक्षरता अभियानासाठी शिक्षकांना दावणीला बांधले जाणार असल्याने रायगड जिल्ह्यातील शिक्षकांनाही या अभियानाला विरोध केला आहे. 15 वर्षापासून पुढील प्रत्येक निरक्षर व्यक्तीला साक्षर करण्यासाठी नवभारत अभियान सुरु करण्यात आले आहे. त्यासाठी तालुका स्तरावर प्रशिक्षण सुरु केले आहे. मात्र या अभियानाच्या कामाला जिल्हा परिषद शिक्षकांनी विरोध दर्शविला आहे. दैनंदिन अध्यापनाचे काम टाकून घरोघरी जाऊन शिक्षकांना या अभियानाचे काम करावे लागणार आहे. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होण्याबरोबरच आपल्या कामावर होण्याची भीती शिक्षकांनी व्यक्त केली आहे. या अभियानाच्या माध्यमातून प्राथमिक शिक्षकांनी निरक्षरांचे सर्वेक्षण करून त्यांना दोन महिन्यात साक्षर करायचे आहे. मात्र यासाठी प्राथमिक शिक्षकांवर भार सोपविल्याने त्यांनी विरोध दर्शविला आहे. याबाबत माध्यमिक शिक्षण अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता, होऊ शकला नाही.

नव साक्षरता अभियान कार्यक्रमाला संपूर्ण राज्यातील प्राथमिक शिक्षकांचा विरोध आहे. याबाबत राज्य स्तरावर समन्वय समितीने निर्णय घेतला असून सरकाराला पत्र दिले आहे. रायगड जिल्ह्यात या कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरु झाली आहे. महाड येथे प्रशिक्षण घेण्याचे नियोजन केले होते.मात्र प्राथमिक शिक्षकांनी त्यावर बहिष्कार टाकला आहे.

राजेंद्र म्हात्रे – अध्यक्ष
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ – शाखा रायगड

Exit mobile version