चित्रलेखा पाटील यांचे प्रतिपादन
I अलिबाग विशेष I प्रतिनिधी I
आई-वडिलांनंतर शिक्षकांकडून बर्याच नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात. म्हणूनच शिक्षकांना दुसरे पालक ही म्हटले जाते. आपले विचार, मत आणि व्यक्तिमत्त्व घडवण्यामागे शिक्षकांचा मोठा वाटा असतो.असे प्रतिपादन पी एन पी च्या कार्यवाह तथा शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी केले.
अलिबाग येथील इकरा एज्युकेशन सोसायटी संचालीत अलिबाग नगर परिषद उर्दु शाळेत शिक्षक दिवसाचे औचित्य साधत विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या .यावेळी व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, माजी उप नगराध्यक्षा अॅड. मानसी म्हात्रे, मुख्याधिकारी अंगाई साळुंके, माजी नगरसेविका वैशाली ठोसर, इकरा एज्युकेशन सोसायटी अलिबागचे अध्यक्ष जमाल सय्यद, सक्रेटरी रमजान सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते. आदी मान्यवर उपस्थीत होते.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना चित्रलेखा पाटील यांनी सांगितले की,जीवनात शिक्षकांचे महत्त्व मोठे आहे.शिक्षकांच्या हातात देशाचे भविष्य असतं कारण शिक्षकांमुळे भविष्यातले डॉक्टर, शास्त्रज्ञ, इंजिनियर, लेखक, शिक्षक आणि अनेक क्षेत्रांमध्ये प्रगती करून देशाचे नाव उंचवणारे सामर्थ्यवान पिढी तयार होते.असे त्या म्हणाल्या.
शिक्षणक्षेत्रात योगदान दिलेल्या शिक्षकांच्या आदरार्थ जगभरात हा दिवस साजरा करण्यात येतो. व्यक्ती आणि समाजाच्या विकासात शिक्षणाचा वाटा मोलाचा आहे. जिथे शिक्षण आहे तिथेच विकास आहे, म्हणूनच शिक्षणातून व्यक्तीची जडणघडण करणार्या शिक्षकाचा आदर करण्याचा हा दिवस असतो.
– चित्रलेखा पाटील, पीएनपी कार्यवाह
मुख्याधिकारी अंगाई साळुंके यांनी सांगितले की,गुरु-शिष्य परंपरा भारतीय संस्कृतीमधील एक महत्त्वपूर्ण आणि पवित्र भाग आहे. जीवनात आई- वडिलांची जागा कुणीही भरू शकत नाही कारण आम्हाला या सुंदर जगात आणण्याचा श्रेय असल्याने जीवनातील सर्वात पहिले गुरु आमचे आई-वडील असतात. भारतात प्राचीन काळापासून गुरु- शिष्य परंपरा असून शिक्षक हे आम्हाला जगण्याचा योग्य मार्ग दाखवतात. योग्य दिशेकडे वाटचाल करण्यासाठी प्रेरित करतात.