मराठवाड्यात बचाव कार्यासाठी रोह्यातील टीम दाखल

| रोहा | प्रतिनिधी |

राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. विशेष: मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, पुराच्या पाण्याने अनेक गावांना वेढा घातल्याचे चित्र आहे. पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. शेकडो जण पुरात अडकले असून बचाव कार्यदेखील युद्धपातळीवर सुरु आहे. या ठिकाणी पुरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी रोह्यातील सह्याद्री वन्यजीव प्राणी संरक्षणार्थ या संस्थेच्या सदस्यांनी जीवाची पर्वा न करता बचाव कार्य सुरु केले आहे. या संस्थेतील तरुणांच्या जिगरबाज कामगिरी बद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

मराठावाड्यातील सोलापूर जिल्ह्यातील माडा तालुक्यातील लहू गावं व धाराशिव या भागात पडलेल्या अतिमुसळधार पावसामुळे साऱ्यांची दाणादाण उडाली आहे. दिवसागणिक अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे भयावह वास्तव समोर येत आहे. तर या पावसाचा सर्वाधिक फटका बळीराजाला बसला आहे. खरीप हंगामातील हातातोंडाशी आलेली उभे पीक पावसाने अक्षरशः मातीमोल केले आहे. परिणामी शेतकरी आता सरकारच्या मदतीकडे आस लावून आहे. अशातच आज देखील पावसाची स्थिती कायम असल्याचा इशारा देण्यात आला आहे. मुसळधार पावसाने अनेक नद्यांनी रौद्ररूप धारण केले आहे. अनेक भागात पुरात अडकलेल्या नागरिकांना एनडीआरएफ जवानांच्या खांद्याला खांदा लावून सागर दहिंबेकर यांच्या नेतृवाखाली रोह्यातील सह्याद्री वन्यजीव प्राणी संरक्षणार्थ संस्थेतील तरुण काम करित आहेत. धाराशिव व लहू या गावात अडकलेल्या शेकडो तरुणांना सुरक्षित ठिकाणी नेण्याचे काम केले असून, आपल्या जीवाची बाजी लावून मदतकार्य करित आहेत.

Exit mobile version