आयसीसी महिला विश्‍व चषकासाठी टीम इंडियाची घोषणा

। मुंबई । वृत्तसंस्था ।
आयसीसी महिला विश्‍वचषक 2022 स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे. मिताली राजच्या नेतृत्वाखाली 15 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. हरमनप्रीत कौरला विश्‍वचषकासाठी उपकर्णधार बनवण्यात आले आहे. तसेच रिचा घोष आणि तानिया भाटिया यांची यष्टिरक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. जेमिमा रॉड्रिग्ज, शिखा पांडे, हरलीन देओल, राधा यादव, वेदा कृष्णमूर्ती यांसारख्या चेहर्‍यांना भारतीय संघात स्थान मिळू शकलेले नाही. जेमिमाची निवड न होणे हे सर्वात आश्‍चर्यकारक आहे. तिने अलीकडेच इंग्लंडमधील द हंड्रेड आणि ऑस्ट्रेलियातील महिला बिग बॅश लीगमध्ये चमकदार खेळ सादर केला होता.


तर सबीनीन मेघना, एकता बिश्त आणि सिमरन दिल बहादूर यांना स्टँडबाय खेळाडूंमध्ये ठेवण्यात आले आहे. महिला विश्‍वचषकात भारतीय संघाचा पहिला सामना 6 मार्च 2022 रोजी पाकिस्तान विरुद्ध टॉरंगा येथे होणार आहे. विश्‍वचषकापूर्वी भारतीय संघ न्यूझीलंडसोबत एकदिवसीय मालिकाही खेळणार आहे. ही मालिका 11 फेब्रुवारीपासून खेळवली जाणार आहे. यामध्ये पाच सामने होणार आहेत. वनडे मालिका 24 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. एक सामना नेपियरमध्ये आणि नेल्सन आणि क्वीन्सटाऊनमध्ये प्रत्येकी दोन सामने खेळवले जातील.


भारतीय संघ
मिताली राज कर्णधार, हरमनप्रीत कौर उपकर्णधार, स्मृती मानधना, शेफाली वर्मा, यास्तिका भाटिया, दीप्ती शर्मा, रिचा घोष विकेटकीपर, स्नेह राणा, झुलन गोस्वामी, पूजा वस्त्राकर, मेघना सिंग, रेणुका सिंग ठाकूर, तानिया भाटिया, राजेश्‍वरी गायकवाड आणि पूनम यादव.

Exit mobile version